शहरात विना क्रमांक चाललेल्या घंटा गाडीवर ७ लाख ७२ हजारांचा दंड आकारावा, सामाजिक कार्येकर्ते रविंद्र कांबळे
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात नियमबाह्य पद्धतीने चाललेल्या वणी नगर पालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कारकर्ते रविंद्र कांबळे यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. वणी नगर पालिकेची घंटा गाडी जवळपास तीन ते चार महिने विना क्रमांक शहरात चालली. या घंटा गाडीने शहरातील एका प्रभागात किरकोळ अपघातही झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर नगर पालिकेने घंटा गाडीवर रेडियमने नंबर लिहिला. पण वाहनावर नंबर प्लेट मात्र लावण्यात आली नाही. वाहनावर रेडियमने नंबर लिहिणे देखिल नियमबाह्य असून राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून विना क्रमांक शहरात चाललेल्या नगर पालिकेच्या घंटा गाडीवर नियमानुसार दंड आकारण्याची मागणी रविंद्र कांबळे यांनी केली आहे.
नगर पालिकेने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. नगर पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नगर पालिका प्रशासनाकडून शहरात कचरा संकलन करण्याकरिता घंटा गाड्या चालविल्या जात आहेत. या घंटा गाड्या शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन कचरा संकलनाचं काम करतात. नगर पालिकेने खरेदी केलेल्या चार घंटा गाडी वाहनांची १६ ऑक्टोबर २०२३ ला परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली. परंतु नगर पालिकेच्या घंटा गाडीवर नंबर प्लेट मात्र लावण्यात आली नाही. MH २९ BE ७०१७ ही घंटा गाडी शहरातील एका प्रभागात १ जानेवारी २०२४ पासून २८ मे २०२४ पर्यंत विना क्रमांक चालली. २२ एप्रिलला या घंटा गाडीने भीम नगर येथे अपघात झाला तेंव्हाही या घंटा गाडीवर नंबर लिहिलेला नव्हता. त्यानंतर विना क्रमांकाच्या या घंटा गाडीचा व्हिडिओ वायरल झाल्याने नगर पालिकेने २९ मे ला या घंटा गाडीवर रेडियमने नंबर लिहिला. आधी विना क्रमांक ही घंटा गाडी शहरात चालली आणि नंतर रेडियमने या घंटा गाडीवर नंबर लिहिण्यात आला. अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करूनही या घंटा गाडीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे विना क्रमांक शहरात चाललेल्या MH २९ BE ७०१७ या घंटा गाडीवर दंडात्मक कार्यवाही करून १ जानेवारी २०२४ ते २८ मे २०२४ पर्यंत १४९ दिवसांचा दंड आकारण्यात यावा. पहिल्या दिवसाचा २ हजार रुपये तर १४८ दिवसांचा ५ हजार रुपये या प्रमाणे एकूण ७ लाख ४० हजार रुपये विना क्रमांक वाहन चालविल्याचा दंड आकारण्याची मागणी रविंद्र कांबळे यांनी केली आहे. तसेच ३० दिवस रेडियमने नंबर लिहून वाहन चालविल्याने या घंटा गाडीवर ३० हजार रुपये अतिरिक्त दंड आकारण्याची मागणी देखील सामाजिक कार्येकर्ते रविंद्र कांबळे यांनी निवेदनातून केली आहे. विना क्रमांक शहरात वाहन चालवून नगर पालिकेने परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या घंटा गाडी वाहनावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. परिवहन अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन MH २९ BE ७०१७ या घंटा गाडीवर ७ लाख ७२ हजार रुपये दंड आकारण्याची वास्तविक मागणी रविंद्र कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे.



No comments: