Latest News

Latest News
Loading...

घरगुती विद्युत वायर चोरीचा सपाटा लावलेल्या दोन भुरट्या चोरांना डीबी पथकाने केली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

घरगुती विद्युत वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. पोलिसांकडून या भुरट्या चोरांचा कसून शोध सुरु असतांनाच त्यांना चोरट्यांबाबत खात्रीदायक माहिती मिळाली. भुरटे चोर हे गणेशपूर परिसरातील असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी लगेच गणेशपूर येथून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना विद्युत वायर चोरीबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलायला लागले. बांधकाम सुरु असलेल्या तीन घरांमधून विद्युत वायर चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. वायर मधील तांब्याची तार काढून भंगार दुकानात विकल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर एक विधिसंघर्षग्रस्त बालकही यात सामील असल्याची कबुली या दोन चोरट्यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्या जवळून १५ किलो तांब्याची तार किंमत ९ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (MH २९ AL ६८३८) किंमत ३० हजार रुपये असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या कडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिसांनी त्यांची पोलिस कोठडी मिळविली आहे. 

नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरांमधून विद्युत वायर चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांवरही चोरट्यांना अटक करण्याचा दबाव वाढला होता. त्यामुळे पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून काही संशयित व्यक्तींची शोध मोहीम सुरु केली. अशातच पोलिसांना संशयित व्यक्ती हे गणेशपूर येथील रहिवाशी असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी लगेच गणेशपूर येथून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला ते दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कुलदीप राजेश मेश्राम (२०), नीरज निळकंठ बोढाले (२०) दोघेही रा. गणेशपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या सोबत एक विधिसंघर्षग्रस्त बालकही चोरीत सहभागी असल्याने या तिघांवरही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरांमधून विद्युत वायर चोरीला गेल्याच्या तीन तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या. साहिल अनिल सलाट (२२) रा. इंदिरा चौक यांच्या तक्रारी नुसार त्यांचे स्वामी समर्थ नगर येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असताना २० फेब्रुवारीला त्यांनी नवीन घरात जोडणी केलेले विद्युत वायर अज्ञात चोरट्यांनी कापून नेले. ५० हजार रुपये किमतीचे वायर चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. अशाच प्रकारची दुसरी तक्रार हरिशंकर मंगाराम पांडे (७६) रा. बाजोरिया लॉनच्या बाजूला यांनी केली. त्यांचे रवी नगर येथे नवीन घराचे बांधकाम सुरु असतांना १२ मार्चला अज्ञात चोरट्यांनी घरात जोडणी केलेले ४० हजार रुपये किमतीचे विद्युत वायर चोरी केले. कुंदन आनंदराव गौरकार यांच्याही गुलमोहर पार्क येथील नवीन घरात जोडणी केले विद्युत वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्यांनी याबाबत २४ जूनला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवून ३० हजार रुपये किमतीचे वायर चोरी गेल्याचे तक्रारीत म्हटले. 

घरगुती विद्युत वायर चोरीच्या या तीन तक्रारींची गंभीर दखल घेऊन चोरीच्या या घटनांचा तपास डीबी पथकाकडे देण्यात आला. डीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज मधील काही संशयित चेहऱ्यांचा शोध घेतानाच डीबी पथकाने खबऱ्यांनाही अलर्ट केले. शेवटी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहिती वरून गणेशपूर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर तेच भुरटे चोर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. ते दोघे व एक अल्पवयीन मुलगा असे तिघे जण नवीन घरात जोडणी केलेले वायर कापून व ओढून चोरी करायचे. नंतर ते वायर जाळून त्यातून निघालेला तांब्याचा तार भंगार दुकानात विकायचे. तशी त्यांनी पोलिसांना कबुलीही दिली आहे. पुढील तपास डीबी पथकाकडून केला जात आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख बलराम झाडोकार, जमादार विकास धडसे, पोना पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसिम, गजानन कुडमेथे, श्याम राठोड यांनी केली. 


No comments:

Powered by Blogger.