प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. तालुक्यातील मुर्धोनी (पळसोनी) येथील एका कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १ ऑगष्टला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक हा वणी येथील एका कपड्याच्या दुकानात कामाला होता. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. पांडुरंग बापूराव तावाडे वय अंदाजे ४५ वर्षे असे या गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
कपड्याच्या दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या कामगाराने जीवनात आलेल्या नैराश्येतून मृत्यूचा मार्ग निवडला. राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवन यात्रा संपविली. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पांडुरंग तावाडे याने गळफास घेतल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला खाली उतरवून घटनेची माहिती गावच्या पोलिस पाटलाला दिली. पोलिस पाटील धोटे यांनी घटनेची माहिती पोलिसांना देऊन गावकऱ्यांच्या मदतीने पांडुरंग तावाडे यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पांडुरंग यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांनी असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुस्वभावी, मनमिळाऊ व सर्वांशी सलोखा ठेवणारे व्यक्ती म्हणून ते गावात व कापड दुकानातही सर्वांच्या परिचयाचे होते. कापड दुकानात काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव होता. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी व १३ वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.

No comments: