प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तहसिल कार्यालयाच्या आवारात उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने एकच खळबळ उडाली होती. ट्रक चोरी गेल्याची तक्रार मारेगाव पोलिस स्टेशनला करण्यात आली. पोलिसांसमोर ट्रक चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान उभे ठाकले होते. अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तर्कशुद्ध पद्धतीने शोध घेऊन चोरट्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. एलसीबी पथकाने वर्धा जिल्ह्यातून चार चोरट्यांना अटक करून त्यांनी चोरून नेलेला ट्रक जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार देखील एलसीबी पथकाने ताब्यात घेतली आहे. एलसीबी पथकाने या धडक कार्यवाहीत एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथक ३१ जुलैला वणी उपविभागात गुन्हेगारांचा शोध व अवैध धंद्यांविरुद्ध माहिती गोळा करीत असतांना पथकाला मारेगाव तहसिल कार्यालय परिसरातून चोरी गेलेला ट्रक वर्धा जिल्ह्यात लपवून ठेवण्यात आला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने वर्धा येथे जाऊन चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना सालोड व पालोती येथील हे आरोपी असल्याचे कळाले. पथकाने सालोड व पालोती येथून या चारही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. शेख अफरोज शेख अब्दुल (३२) रा. सालोड, शेख रोशन शेख अब्दुल (३५) रा. पालोती, प्रणय धनराज पोहणे (२४) रा. पालोती, पवन देवरावजी किनाके (२३) रा. सालोड अशी या एलसीबी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केलेला ट्रक वर्धा जिल्ह्यातील आंजी नदी जवळ लपवून ठेवला असल्याचे सांगितले. एलसीबी पथकाने त्यांच्या जवळून चोरीचा ट्रक ( MH ३६-१६७५) किंमत २ लाख ५० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार किंमत ३ लाख रुपये असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाने चोरीचा हा गुन्हा उघडकीस आणून चारही आरोपींना पुढील कार्यवाही करीता मारेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्था.गु. शाखा पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते यांच्या मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पो.अं सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, योगेश डगवार, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनीकांत मडावी, सतिश फुके यांनी केली.


No comments: