Latest News

Latest News
Loading...

एकाने व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी तर दुसरा म्हणतो चुकाऱ्यासाठी गेलो होतो, दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारी

प्रशांत चंदनखेडे वणी 

दीपक चौपाटी परिसरात अवैध व्यवसायावरून एकमेकांना शिवीगाळ, धमकी व मारहाण केल्याची घटना ३१ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. दोघांनीही एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविल्याने पोलिसांनी दोनही गटातील लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. एकाने व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप केला. तर दुसऱ्याने मटका पट्टीचा व्हिडिओ काढल्याचा आळ घेऊन काठीने मारहाण केल्याची तक्रार नोंदविली आहे. 

याबाबत आरिफ रहेमान खलील रहेमान (४८) रा. काळे ले-आऊट यांनी दिलेल्या तक्रारी नुसार ते ३१ जुलैला सायंकाळी ६.३० वाजता दीपक चौपाटी येथील अब्बास यांच्या चिकन विक्रीच्या दुकानाजवळ उभे असतांना शेख सद्दाम शेख उस्मान, क्षितिज लायनु इंगळे दोघेही रा. रंगनाथ नगर, जुबेर खान अकबर खान रा. काजीपुरा, फैजल खान फिरोज खान, अब्दुल फरहान अब्दुल गफ्फार दोन्ही रा. मोमीनपुरा हे पाचही जण त्यांच्या जवळ आले. तुम्ही दोन नंबरचे धंदे करता असे म्हणत त्यातील शेख सद्दाम शेख उस्मान याने आरिफ यांना अश्लील शिवीगाळ करीत येथे धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असा सज्जड दम दिला. त्यानंतर त्याने माझ्या बॉस सोबत बोल म्हणून फोन आरिफच्या कानाला लावला. सद्दामचा बॉस असलेल्या फारुख चिनी यांनी मला तू तीन लाख रुपये का दिले नाही असे म्हणत तुझा व्हिडिओ वायरल करू काय, अशी धमकी दिली. पोलिस स्टेशन माझ्या मुठ्ठीत आहे, असे वक्तव्य करून फारुख चिनी यांनी फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आरिफ यांनी तक्रारीतून केला आहे. तसेच पैसे न दिल्यास व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सद्दाम शेख याने फोन कट करून आरिफ यांना शिवीगाळ करणे सुरु केले. त्यामुळे आरिफ यांनीही सद्दाम यांना शिव्या दिल्या. तेंव्हा सद्दाम याने आरिफ यांची कॉलर पकडून त्यांना बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी (किंमत ५४ हजार रुपये) हिसकावून घेत त्यांच्या शर्टच्या खिशातील १६४० रुपये जबरदस्तीने काढले व तो तिथून निघून गेला. त्यानंतर आरिफ यांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. उपचार घेऊन परतल्यानंतर त्यांनी १ ऑगस्टला पोलिस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली. आरिफ रहेमान यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सद्दाम उस्मान शेख, क्षितिज लायनु इंगळे, जुबेर खान अकबर खान, फैजल खान फिरोज खान, अब्दुल फरहान अब्दुल गफ्फार व फारुख चिनी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११९(१), ३०८(३), १८९(२), १९१(२), १९०, २९२, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी शेख सद्दाम शेख उस्मान (२८) रा. रंगनाथ नगर यांनी देखील तक्रार नोंदविली असून त्यांच्या तक्रारी नुसार ते ३१ जुलैला साय. ५.३० सट्टा लावण्याकरिता दीपक चौपाटी परिसरात गेले होते. सट्टा लावून ते बाजूला उभे होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राला फोन लावून मटक्यात कोणता आकडा आला असे विचारले. मित्राने आलेला आकडा सांगितला व तोच आकडा सद्दाम यांनीही लावला असल्याने ते मटक्याचा चुकारा घेण्याकरिता आरीफुर रहमान खलील रहमान यांच्याकडे गेले. मात्र त्यांनी सद्दामला थांबण्यास सांगितले. त्यानंतर आरीफुर रहमान यांनी आपल्या मटका घेणाऱ्या लोकांना बोलावून सद्दाम यांचा मोबाईल व मोपेडची चाबी हिसकावून घेतली. तसेच मटका पट्टीचा व्हिडिओ काढला असा त्यांच्यावर आळ घेत त्यांना काठीने मारहाण केली. तथा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यांनतर आरीफुर यांनीच सद्दाम यांना पोलिस स्टेशनला आणले. पोलिस स्टेशनला आल्यानंतर सद्दाम यांनी आरीफुर यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. दरम्यान आपसी समेट झाल्याने सद्दाम यांनी तक्रार मागे घेतली होती. मात्र नंतर १ ऑगष्टला परत सद्दाम यांनी तक्रार कायम ठेवण्यास सांगितल्याने पोलिसांनी संबंधितांवर बीएमएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.