जिल्हा परिषद शाळेचा डोलारा एकाच शिक्षकावर, शाळेला शिक्षक न दिल्यास पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
निंबाळा (बु.) या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे. या शाळेत एकूण ३२ विद्यार्थी आहेत. वर्ग १ ते ५ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याची जबादारी एकाच शिक्षकावर आहे. अनेक दिवसांपासून या शाळेला अतिरिक्त शिक्षक देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ लागलं आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ढासळू लागला आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अनेक वर्षांपासून शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात न आल्याने जी.प. शाळेत शिक्षकांचा अभाव दिसून येत आहे. एकच शिक्षक शाळेची काळजी वाहतो आहे. शासनाकडून प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले असतांना व साक्षरता अभियान राबविले जात असतांना शासकीय शाळेतच शिक्षणाची अशी दुरावस्था झाल्याने शासनाचा दुटप्पीपणा समोर येऊ लागला आहे.
जी.प शाळेची ढासळलेली शैक्षणिक अवस्था बघता शासनाच्या शैक्षणिक धोरणावरच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे. बहुतांश शाळेत एकच शिक्षक शाळेची धुरा वाहतो आहे. त्यामुळे पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या शिक्षणाला घेऊन चांगलाच चिंतेत आला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खालावल्याने जी.प. शाळेत विद्यार्थ्यांची गळती लागली आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना तेथेच शिक्षण घ्यावे लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील निंबाळा (बु.) येथील जी.प. शाळेत एकच शिक्षक वर्ग १ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ गिरवत असल्याने पालकांमधून कमालीचा असंतोष खदखदत आहे. या शाळेला शिक्षक देण्याची गावकऱ्यांमधून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आठ दिवसांत निंबाळा(बु.) येथील जी.प. शाळेला अतिरिक्त शिक्षक देण्यात न आल्यास पंचायत समितीतच शाळा भरविण्याचा इशारा शिवसेनेचे (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशच्या किरण देरकर, ममता पारखी, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सरपंच अजय कवरसे, प्रविण गोहणे, हरिश्चंद्र डवरे, संदीप मुसळे, अमोल वाघाडे, प्रशांत शेंडे, आकाश आसुटकर ताठ निंबाळा (बु.) येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments: