प्रशांत चंदनखेडे वणी
सर्वदूर कोसळधार पाऊस सुरु असल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नालेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाल्यांना पूर आल्याने ते पार करणे धोकादायक ठरू लागले आहे. नाला पार करण्याच्या प्रयत्नात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नाला पार करण्याच्या प्रयत्नात चिचमंडळ येथील वृद्ध वाहून गेला होता. तर आज २ ऑगष्टला वर्धा नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या इसमाची ओळख पटली असून तो हिंगणघाट येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेश रामभाऊ साधनकर वय ६३ वर्षे असे या वर्धा नदीत वाहून आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने नदीत उडी घेतली की त्याचा तोल गेला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
झोला शिवारातील वर्धा नदी पात्रात शुक्रवारी दुपारी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतकाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. मात्र काही तासांतच पोलिसांना त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. जमादार विठ्ठल बुर्रेवार यांनी तपासचक्रे फिरवून मृतदेहाची ओळख पटविली आहे. मृतक राजेश रामभाऊ साधनकर हा टिळक नगर हिंगणघाट जि. वर्धा येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. त्याच्या नातेवाईकांनी वणी पोलिस स्टेशनला येऊन मृतकाच्या ओळखीचे प्रमाण दिले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह आप्तस्वकीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. दुपारी वर्धा नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह तेथीलच काही लोकांना तरंगताना आढळून आला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास पूर्ण केला आहे.


No comments: