Latest News

Latest News
Loading...

उच्च शिक्षित तरुणीने वर्धा नदीत घेतली उडी, पोलिसांकडून शोध मोहीम सुरु


प्रशांत चंदनखेडे वणी 

मारेगाव येथील एका उच्च शिक्षित तरुणीने वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक व तेवढीच मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. २ ऑगष्टला महाविद्यालयीन कामाकरिता जातो म्हणून घरून निघालेल्या तरुणीने दुपारच्या सुमारास पाटाळा पुलावर येऊन वर्धा नदीत उडी घेतली. सीसीटीव्ही फुटेज मधून या तरुणीने नदीत उडी घेतल्याची पुष्टी झाली आहे. माधुरी अरुण खैरे (२८) रा. मारेगाव असे या नदीत उडी घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचा नदी पात्रात शोध घेतला जात आहे. सर्वदूर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने शोध मोहीम राबविणाऱ्या पथकासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तरुणीने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मारेगाव येथील वार्ड क्रमांक ५ मधील रहिवाशी असलेली माधुरी वणी येथे महाविद्यालयीन कामाकरिता जातो म्हणून घरून निघाली. माधुरीने कॉलेजमध्ये फार्मसीचा कोर्स पूर्ण केला होता. वणीला आल्यानंतर माधुरी ही ऑटोने पाटाळा पुलावर आली. नदीवर फोटो शूट करण्याचे कारण सांगून ती ऑटोतून पाटाळा पुलावर उतरली. त्यानंतर तिने पर्स, चप्पल व मोबाईल पुलाजवळ ठेऊन नदीत उडी घेतली. दरम्यान माजरी येथील एक दाम्पत्य पाटाळा पुलावर फोटो काढण्याकरिता थांबले असता त्यांना कुणाचा तरी मोबाईल वाजत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन बघतले असता त्यांना पुलावर ठेऊन असलेल्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन येत असल्याचे दिसले. मात्र आजूबाजूला कुणीच आढळून आले नाही. त्यांनी फोन उचलला असता माधुरीच्या भावाचे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी मोबाईल, चप्पल व पर्स वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर बेवारस स्थितीत ठेऊन असल्याचे माधुरीच्या भावाला सांगितले. हे ऐकताच माधुरीच्या भावाने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पाटाळा पुलावर लावून असलेले सीसीटीव्ही त्याने तपासले. त्यात माधुरी ही पुलावरून नदीपात्रात उडी घेतांना आढळून आली. त्यामुळे त्याला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर ही माहिती माजरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. आज सकाळ पासून नदीपात्रात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

माधुरीचे वडील अरुण खैरे यांचे १० वर्षांपूर्वी तर आईचे मार्च महिन्यात निधन झाले होते. त्यामुळे दोघे बहीण भाऊ हे एकमेकांचा आधार बनून होते. मात्र माधुरीने जीवनात आलेल्या नैराश्येतून टोकाचा निर्णय घेतला. उच्च शिक्षित तरुणीने परिस्थितीचा सामना करण्याऐवजी मानसिक खच्चीकरणातून नदीत उडी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुणाईमध्ये निर्णय व आव्हाने पेलण्याची क्षमता उरली नसल्याचे सतत होणाऱ्या आत्महत्यांवरून दिसून येत आहे. प्रत्येक तालुक्यात लाखो रुपये खर्चून मनोरंजक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र युकांमध्ये जगण्याची उर्मी निर्माण करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम कुणीच आयोजित करतांना दिसत नाही. युवकांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण करणारे व त्यांचा जीवनाविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलविणारे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. उच्च शिक्षित तरुणीने जीवनाला कंटाळून नदीत उडी घेतल्याने प्रशासनाने आता चिंतन करणे गरजेचे झाले आहे. युवकांचे समुपदेशन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 



No comments:

Powered by Blogger.