Latest News

Latest News
Loading...

बसस्थानकात बॉम्ब, यंत्रणा सतर्क, पोलिसांचा मोठा फौजफाटा! मात्र ती होती पोलिसांची रंगीत तालीम

प्रशांत चंदनखेडे वणी 

दुपारी १२ ते १ ची वेळ. वणी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले होते. प्रवाशांची प्रवासासाठीची लगबग सुरु होती. अशातच शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात अचानक पोलिसांचा मोठा फौज फाटा दिसून येतो. पोलिस पथक क्षणात बसस्थानकाचा ताबा घेतं. हे पाहून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. बसस्थानकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून प्रवाशांच्या उरात धडकी भरते. एवढ्यात बसस्थाकात बॉम्ब असल्याचे प्रवाशांच्या कानावर पडते. घातपात घडविण्याकरिता बॉम्ब असलेली बॅग बसस्थानक परिसरात ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. हे ऐकून प्रवाशांचा चांगलाच थरकाप उडतो. हळूहळू ही वार्ता शहरात पसरते, व शहरवासी बसस्थानक परिसरात एकच गर्दी करतात. बसस्थानकात बॉम्ब असल्याच्या चर्चेने बसस्थानक परिसरात मोठा गोंधळ उडतो. सर्वांच्याच चेहऱ्यांवर भीतीचे सावट पसरलेले असते. तेवढयात बॉम्ब शोधक व नाशक पथक तथा श्वान पथकाच्या मदतीने पार्किंग परिसरात शोध घेऊन बॉम्ब असलेली बॅग शोधून काढण्यात येते. मात्र बॉम्ब निष्क्रिय होऊ शकणारा नसल्याने त्याचा निर्जनस्थळी नेऊन ब्लास्ट करण्यात येतो. नंतर फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून घटनास्थळावरील इतर भौतिक दुवेही तपासले जातात. बॉम्ब निष्क्रिय होताच बसस्थानकातील प्रवाशी व बसस्थानकाबाहेरील नागरिक सुटकेचा निश्वास सोडतात. नंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने घटनेदरम्यान रस्त्यावर रोखून धरलेली रहदारी सुरळीत करण्यात येते. मात्र बसस्थानक परिसरात बॉम्ब आढळल्याने धास्ती भरलेल्या नागरिकांना नंतर ही पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे सांगण्यात येते. तेंव्हा कुठे नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. 

अतिरेकी कारवाया किंवा घातपाताच्या घटनांप्रसंगी घ्यावयाची खबरदारी आणि निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची याबाबत मॅकड्रील मोहीम राबविली जाते. या रंगीत तालमीतून यंत्रणा किती तत्पर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच घातपाती कारवाया रोखण्यात काही उणीवा तर राहिल्या नाहीत, याचाही शोध घेतला जातो. बॉम्ब कॉल आल्यानंतर घ्यावयाची दक्षता व पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना या तालमीतून प्रत्येक्षात उतरविल्या जातात. अशा प्रकारची घटना घडल्यास पोलिसांनी काय करावे, नागरिकांनी सावधानता कशी बाळगावी, याची माहिती कृतीतून दाखविली जाते. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षेच्या अनुषंगाने कायमस्वरूपी नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०७२३९-२४२७०० किंवा ११२ वर संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. 

या रंगीत तालमीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, यांच्या मार्गदर्शनात सपोनि सारंग बोम्पीलवार (दहशतवाद विरोधी शाखा प्रमुख), पोउपनि परांडे (बॉम्ब शोधक व नाशक पथक), पोउपनि धवणे (क्यूआरटी पथक प्रमुख) तथा वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहेरानी, वणी वाहतूक उपशाखा सपोनि सिता वाघमारे, सपोनि सुरेश परसोडे (अंगुलीमुद्रा विभाग) तसेच वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दल यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

No comments:

Powered by Blogger.