प्रशांत चंदनखेडे वणी
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान लागावे व त्यावर शीघ्र उपचार मिळवा या दृष्टीकोनातून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते टीकाराम कोंगरे व महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील शेतकरी मंदिर येथे १३ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत महिलांसाठी निःशुल्क ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे. नागपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ टीमकडून शिबिरार्थी महिलांची तपासणी करण्यात येणार आहे.
कर्करोग हा एक दुर्धर व गंभीर आजार आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याने या रोगाचे वेळेत निदान लागावे व रुग्णांना शीघ्र उपचार घेता यावा या उद्देशातून गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकारातून ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला महिला काँग्रेसचेही विशेष सहकार्य लाभणार आहे. शहरातील शेतकरी मंदिरात या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी अधिक माहितीसाठी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, तालुकाध्यक्ष सुरेखा लोडे, शहरध्यक्ष शामा तोटेवार, मारेगाव तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष माया गाडगे, झरी तालुकाध्यक्ष देवका येनगंटीवार यांच्याकडे संपर्क साधावा. या शिबिराच्या उत्तम नियोजनाची जबादारी मेघश्याम तांबेकर, प्रमोद वासेकर, आशिष मोहितकर हे पार पाडत आहेत. या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन काँग्रेस नेते टिकाराम कोंगरे यांनी केले आहे.


No comments: