Latest News

Latest News
Loading...

लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याची मागितली परवानगी

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविकांनी आरोग्य सहाय्यकाची झरीजामणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशाखा समितीने कोणतेही लेखी पुरावे मागितले नाही. त्यामुळे विशाखा समितीने केलेली चौकशी तथा नोंदविलेले बयान व आरोग्य सेविकांच्या खोट्या तक्रारी मान्य नसल्याबाबत आरोग्य सहाय्यकांनी समितीच्या अहवालावर स्वाक्षरी केली आहे. कंत्राटी आरोग्य सेविकांनी हे सर्व जातीय द्वेषातून घडवून आणल्याचा आरोप मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यकाने केला असून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याकरिता जातीय आकसापोटी त्यांनी तक्रार केल्याचे आरोग्य सहाय्यकाचे म्हणणे आहे. लेखी पुराव्यांची पडताळणी न करता आरोग्य सेविकांच्या खोट्या तक्रारी वरून विशाखा समितीने चौकशी अहवाल तयार केल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पासून सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय आरोग्य सहाय्यकांनी घेतला आहे. त्यामुळे परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक आशिष गुलाबराव मडावी यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.  

झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन प्रा. आ. केंद्रातील तिन कंत्राटी आरोग्य सेविकांनी तेथीलच आरोग्य सहाय्यक आशिष मडावी यांची झरीजामणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मुकुटबन प्रा. आ. केंद्राच्या अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता थेट त्यांनी तालूका आरोग्य अधिकाऱ्यांकडे परस्पर तक्रार केल्याने त्यांची जातीय द्वेषाची मानसिकता दिसून येत आहे. आकांक्षीत क्षेत्र आदिवासी दुर्भा उपकेंद्र येथे सेवारत असलेल्या व मुख्यालयी न राहणाऱ्या या आरोग्य सेविकांनी जातीय द्वेषभावनेतून तक्रार केल्याचा आरोप आशिष मडावी यांनी निवेदनातून केला आहे. २७ जूनला वैद्यकीय अधिकारी शिबला व विशाखा समितीचे अध्यक्ष डॉ. मगरे याच्या समक्ष सर्वांची बयाणे घेण्यात आली. मात्र आरोग्य सेविकांनी कुठलेही लेखी पुरावे चौकशी समिती समोर सादर केले नाही. तरीही त्यांच्या खोट्या आरोपावरून विशाखा समितीच्या अध्यक्षांनी चौकशी अहवाल तयार केला. मात्र आरोग्य सेविकांच्या खोट्या तक्रारी मान्य नसल्याचे आशिष मडावी यांनी चौकशी समिती समोर स्पष्ट केले असून तशी त्यांनी चौकशी अहवालावर स्वाक्षरी देखील केली आहे. विशाखा समितीच्या अध्यक्षांनी तक्रारकर्त्यांना लेखी पुरावे न मागता त्यांची केवळ जबानी घेतल्याने समितीच्या अध्यक्षांची सुद्धा तीच मानसिकता दिसून येते, असाही आरोप आरोग्य सहाय्यकांनी निवेदनातून केला आहे. 

आशिष मडावी हे १८ वर्षांपासून जी. प. आरोग्य विभागात कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून ते मुकुटबन प्रा. आ. केंद्रात सेवा देत आहेत. त्यांच्या उत्तम सेवेबद्दल सर्व समाधानी आहेत. झरीजामणी तालुका आकांक्षीक क्षेत्रामध्ये मोडत असून आदिवासी रुग्णांना उच्च दर्जाची सेवा पुरविली जात असल्याने त्यांच्यात आरोग्यविषयक जनजागृती होऊ लागली आहे. आदिवासी समुहाला मिळणारी उत्तम आरोग्यसेवा या कंत्राटी आरोग्य सेविकांना बघविली नाही. आणि त्यामुळेच त्यांनी आशिष मडावी यांची आकसापोटी तक्रार केल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. विशाखा समितीचे अध्यक्ष डॉ. मगर यांनी अद्यापही त्यांना लेखी पुरावे न मागितल्याने त्यांचीही तीच मानसिकता दिसून येत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती अन्याय निवारण समिती कडून सखोल चौकशी करून संबंधितांवर ऍट्रॉसिटी व फौजदारी गुन्हे दाखल करावे. अन्यथा मला व माझ्या परिवाराला १५ ऑगस्ट लोकशाही दीना पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी आरोग्य सहाय्यक आशिष मडावी यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

आशिष मडावी यांची आई दोन्ही पायांनी अधू असून त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत. त्या अंथरुणाला खिळलेल्या आहेत. आशिष मडावी यांना सुद्धा उच्च रक्तदाब व मधुमेह आहे. असे असतांना देखील ते पत्नी व मुलासह संपूर्ण परिवाराला घेऊन ७७ व्या स्वातंत्र्य दीना पासून आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असून तशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली आहे.

No comments:

Powered by Blogger.