Latest News

Latest News
Loading...

मारेगाव वरून वणीला येऊन वर्धा नदीत उडी घेणाऱ्या तरुणीचा आढळला मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणीचा बुधवारला सायंकाळी उशिरा चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावाजवळ मृतदेह आढळून आल्याने आत्महत्येच्या या घटनेला पूर्ण विराम मिळाला आहे. मारेगाव येथिल वार्ड क्रमांक ५ मध्ये वास्तव्यास असलेल्या या उच्च शिक्षित तरुणीने नैराश्येतून शुक्रवार २ ऑगस्टला दुपारी वर्धा नदीत उडी घेतली होती. त्यानंतर तिचा शोध पथकाकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारला सायंकाळी माजरी गावाजवळील वर्धा नदीपात्रात चिखलात फसलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. माधुरी अरुण खैरे (२८) असे या नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

मारेगाव येथे आपल्या भावासोबत राहत असलेल्या तरुणीने पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना २ ऑगस्टला दुपारी उघडकीस आली. वणी येथे कॉलेजच्या कामानिमित्त जाते म्हणून माधुरी घरून निघाली. मात्र तिच्या मनात वेगळेच काही तरी सुरु होते. वणीला आल्यानंतर तिने माजरी जाणाऱ्या ऑटोतून पाटाळा पूल गाठला. मोबाईल, पर्स व चप्पल पाटाळा पुलावरच ठेऊन जड अंतःकरणाने तिने वर्धा नदीत उडी घेतली. दरम्यान पाटाळा पुलावरून मार्गस्थ असलेलं एक दाम्पत्य वर्धा नदीच्या प्रवाहाचे फोटो काढण्याकरिता पुलावर थांबलं. दाम्पत्य फोटो काढत असतांनाच त्यांना जवळच मोबाईलची रिंग वाजत असल्याचे जाणवले. त्यांनी आणखी जवळ जाऊन पहिले तर काय, त्यांना मोबाईल, चप्पल व पर्स बेवारसपणे ठेवलेले दिसले. त्यांनी मोबाईल वरील कॉल रिसिव्ह करीत सदर वस्तू या पाटाळा पुलावर संशयास्पद स्थितीत ठेऊन असल्याचे सांगितले. मोबाईलवर फोन करणारा तरुणीचा भाऊच होता. त्याला ही माहिती मिळताच त्याने तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भावाने पाटाळा पुलावरील सीसीटीव्ही तपासली असता त्याला माधुरी ही नदीपात्रात उडी घेतांना दिसली. माधुरीने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने भावाला चांगलाच धक्का बसला. माधुरीने फार्मसीचा कोर्स पूर्ण केला होता. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले तिचे आई वडील या जगात नाहीत. हे दोघेच बहीण भाऊ एकमेकांच्या आधाराने राहत होते. अशातच माधुरीने नैराश्येतून आत्मघाती निर्णय घेतला. 

मारेगाव वरून वणीला येऊन तिने पाटाळा पूल गाठत वर्धा नदीत उडी घेतली. उच्च शिक्षित तरुणीने असा हा आत्महत्येचा मार्ग का निवडला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तब्बल पाच दिवसानंतर माजरी गावाजवळ तिचा चिखलात फसलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीत वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आज शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पोलिस तिच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.  



No comments:

Powered by Blogger.