Latest News

Latest News
Loading...

गावी परतणाऱ्या इसमाचा दुचाकी अपघातात मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी 

कामा निमित्त बाहेरगावी गेलेला इसम दुचाकीने गावी परतत असतांना दुचाकीला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना १४ ऑगस्टला रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वणी यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वळण रस्त्याजवळ हा अपघात घडला. बंडू नामदेव जोगी (४५) रा. ताटेवार ले - आऊट लालगुडा असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. बंडू जोगी हे जेसीबी ऑपरेटर असल्याचे सांगण्यात येते. 

शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायत हद्दीतील ताटेवार ले - आऊट येथे परिवारासह राहत असलेले बंडू जोगी हे जेसीबी ऑपरेटर होते. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री ते दुचाकीने (MH ३४ BA २४१६) गावी परतत असतांना वणी यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वळण रस्त्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात येत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. दुचाकीला अपघात झाल्यानंतर ते काही वेळ रोडवरच पडून राहिले. नंतर त्यांच्या अपघाताची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडू जोगी यांना तात्काळ चंद्रपूर येथे हलविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. 

वडगाव वळण रस्त्याजवळ या आधीही बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना अपघातात आपला जीवही गमवावा लागला. याठिकाणी कोळसा वाहतूक कंपन्यांचे कॅम्प असून ट्रान्सपोर्ट कंपन्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. याठिकाणी रस्त्यालगत कोळशाची काळी धूळही मोठ्या प्रमाणात जमा होऊन असलेली पहायला मिळते. रस्त्यालगत असलेल्या धुळीमुळे दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणी यवतमाळ बायपास मार्गाने कोळसा वाहतुकीची वाहने सुसाट धावतात. रात्रीला वाहनांचे लाईट डोळ्यावर पडल्यानंतर रस्त्यालगत असलेली धूळ दिसत नाही, व त्यावरून दुचाकी गेल्यानंतर ती स्लिप होते. आणि जीवघेणे अपघात घडतात. सदर इसमाचा अपघात हा दुचाकी अनियंत्रित होऊन झाला, की अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याच्या अशा या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बंडू जोगी यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 




No comments:

Powered by Blogger.