प्रशांत चंदनखेडे वणी
सरकारकडून महिलांसाठी विविध लाभकारी योजना राबविल्या जात आहेत. नुकतीच सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना सरकार कडून दरमहा १५०० मिळणार आहेत. त्यानुसार दोन महिन्यांची रक्कम काही महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाली आहे. मात्र या योजनेबाबत विविध क्षेत्रातून व समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निवडणुकीचा काळ लक्षात घेता सरकार वोट बँक मजबूत करण्याकरिता विविध योजना राबवित असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरकारला महिलांचा पुळका आला असल्याचा मतप्रवाह समाज माध्यमातून वाहत आहे. लाडकी बहीण योजने वरून चांगल्या व वाईट अशा दोनही प्रतिक्रिया उमटत आहेत. लाडकी बहीण योजना राबविण्यात आल्यानंतर सोशल मीडियातून सरकारला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. हे सर्व निवडणुकीचे डावपेच असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. ही योजना म्हणजे महिलांची मते कॅश करण्याचा प्रयत्न असल्याच्याही प्रतिक्रिया उमटल्या. महिलांची सहानुभूती व मते मिळविण्याकरिता बहिणींचे लाड पुरविले जात असल्याच्याही तीक्ष्ण प्रतिक्रिया सोशल मीडियातून ऐकायला मिळाल्या.
मात्र महिलांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. महिलांच्या आर्थिक बळकटीकरणाकरिता ही योजना फायद्याची ठरल्याच्याही सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून असंख्य महिलांनी अर्ज केले. अंदाजे १ कोटी ३५ लाखांच्यावर महिलांनी अर्ज केल्याची प्राथमिक माहिती आहे. योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची महिलांनी पूर्तता केली. आता या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणे सुरु झाले आहे. त्यामुळे बँकांमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केले, त्यांच्या खात्यावर १७ ऑगस्ट पर्यंत ३००० हजार रुपये जमा होतील. तसेच ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केले, त्यांना पुढील हप्त्यात पैसे मिळतील. ३१ जुलै पूर्वी अर्ज करूनही ज्या महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नसेल, त्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. त्यामुळे अशा खातेधारकांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. तसेच काही खातेदारांची केवायसी न झाल्याने देखील त्यांच्या खात्यात व्यवहार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे व ज्यांचे बँक खात्यावर व्यवहार सुरु आहेत, अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३००० हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सरकार कडून मिळालेले पैसे काढण्याकरिता लाडक्या बहिणींनी बँकेत एकच गर्दी केली आहे. सरकार कडून पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत आहे.


No comments: