Latest News

Latest News
Loading...

युवा शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, शेतात काम करतांना विषारी सापाने घेतला चावा

प्रशांत चंदनखेडे वणी 

शेतात काम करतांना विषारी सापाचा दंश झाल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. १७  ऑगस्टला घडली. हा युवा शेतकरी शेतात काम करीत असतांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याला विषारी सापाने दंश केला. सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या मित्राला फोन करून ही माहिती दिली. मित्राने लगेच शेताकडे धाव घेत काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला घुग्गुस येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात येत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रविंद्र सुधाकर राहुलवार (३९) असे या सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यातील येनाडी येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या रविंद्र राहुलवार या युवा शेतकऱ्याला शेतात काम करतांना विषारी सापाने चावा घेतला. रविंद्र याच्याकडे ६ एकर शेती होती. तो शेती करून आपला प्रपंच चालवायचा. १७ ऑगस्टला नेहमी प्रमाणे शेतात काम करीत असतांना त्याला सापाने दंश केला. त्याने ही माहिती लगेच आपल्या मित्राला दिली. मित्रानेही लगेच शेताकडे धाव घेतली. मित्र शेतात पोहचला तेंव्हा रविंद्र जमिनीवर पडून होता. मित्राने काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ घुग्गुस येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. रविंद्र राहुलवार याला चंद्रपूर येथे हलविण्यात येत असतांनाच त्याने वाटेत शेवटचा श्वास घेतला. त्याच्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविंद्र राहुलवार याच्या पश्च्यात आई, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.  


No comments:

Powered by Blogger.