Latest News

Latest News
Loading...

शहरात उद्या प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

प्रशांत चंदनखेडे वणी 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, राजकीय विश्लेषक, सामाजिक अभ्यासक तथा प्रख्यात विचारवंत प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष, शेतकरी संघटना व विदर्भ जन आंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १८ ऑगस्टला दुपारी ३  वाजता शेतकरी मंदिर येथे प्रा. श्याम मानव यांचं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. "लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज" या विषयावर ते संबोधित करणार आहेत. 

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार असून जेष्ठ साहित्यिक दशरथ मडावी (यवतमाळ) यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, माजी आमदार विश्वास नांदेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनिल हेपट, मराठा सेवा संघ वणीचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, माकपचे ऍड. कुमार मोहरमपुरी, शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, डॉक्टर असोसिएशन वणीचे डॉ. रमेश सपाट उपस्थित राहणार आहेत. 

प्रा. श्याम मानव अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. सामाजिक अंधश्रद्धा दूर करण्याचा त्यांनी विडा उचलला आहे. अंधश्रद्धेवर घाला घालणारे अनेक प्रयोग त्यांनी करून दाखविले आहेत. अंधश्रद्धा ही आधुनिक विचारांचा ऱ्हास करणारी ठरत असल्याने त्यावर कायद्याने बंदी घालण्याबाबत त्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. अंधश्रद्धेमुळे कित्येकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहेत. अनेकांचे जीवही या अंधश्रद्धेने घेतले आहेत. बुवाबाजी व चमत्कारी प्रवृत्तींना त्यांनी खुले आव्हान दिले आहे. परंतु आजपर्यंत कुणीही त्यांचे चॅलेंज स्वीकारलेले नाही. अंधश्रद्धेवर त्यांनी नेहमीच घणाघात केला आहे. अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी अख्या महाराष्ट्रात जनजागृती मोहीम राबविली. आता त्यांनी राजकीय भूमिका घेतल्याने राजकीय अंधश्रद्धा दूर करण्यात त्यांचं हे व्याख्यान मोलाचं ठरणार असल्याने लोकशाहीवर विश्वास असलेल्या सुजाण नागरिकांनी या जाहीर व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुरोगामी व परिवर्तनवादी विचारसरणी असलेल्या विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी केले आहे. 



No comments:

Powered by Blogger.