प्रशांत चंदनखेडे वणी
खाकी वर्दीतही एक मन भावना जपणारा माणूस दडला आहे. त्याच्या प्रतीही कुणी स्नेहभाव दाखवावा अशी त्याची अपेक्षा असते. त्याच्या विषयी आपुलकी निर्माण व्हावी असं त्याला नेहमी वाटत असतं. त्याला भाऊ, दादा म्हणून संबोधलं जातं. पण बंधुत्वाच्या नात्याची गुंफण मात्र होतांना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांविषयी आपुलकी, प्रेम, भावनेचं नातं निर्माण व्हावं या संकल्पनेतून सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांच्या प्रती आस्था दाखविली जाते. पोलिस बांधवांचं औक्षण करून त्यांच्याकडे स्त्रियांच्या रक्षणाची ओवाळणी मागितली जाते. मागील पाच वर्षांपासून अविरतपणे हा उपक्रम राबविला जात आहे. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर यांच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याची ही परंपरा अखंडितपणे सुरु आहे.
भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा हा रक्षाबंधन सण आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणाऱ्या या सणाला बहीण भावाकडून सर्वस्वी रक्षणाची हमी मागते. बहीण भावाचं अतूट नातं जपणारा रक्षाबंधन हा सण सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या महिलांनी पोलिस बांधवांसोबत साजरा केला. पोलिसांना राखी बांधून त्यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्याकडे महिलांच्या रक्षणाची ओवाळणी मागण्यात आली. जनतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलिस बांधवांना सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सर्व बहिणींनी राखी बांधून बंधुभावाची आपली संस्कृती जपली आहे. जनतेच्या रक्षणाप्रती आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना राखी बांधण्याची ही परंपरा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन कडून अखंडितपणे सुरु आहे. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी रक्षाबंधन दिनी पोलिस स्टेशन येथे येऊन उपवविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी, एपीआय निलेश अपसुंदे, पीएसआय अश्विनी रायबोले, गुप्तचर विभागाचे शेखर वांढरे, एएसआय स्वाती कुटे यांच्यासह पोलिस विभाग व वाहतूक विभागातील पोलिस बांधवांना राखी बांधली.यावेळी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्यासह पदाधिकारी संचालिका सारिका थेरे, माधुरी सुंकुरवार, निता देठे, शालिनी देरकर, सपना आस्वले, अर्चना झाडे, माधुरी माटे, वृषाली खानझोडे, स्नेहा लालसरे, सुरेखा ढेंगळे, वैशाली देठे, कांचन सिडाम या प्रामुख्याने उपस्थित होत्या.




No comments: