प्रशांत चंदनखेडे वणी
वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ अतिक्रमित जागेवर असलेला धाबा गावातीलच महिलांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना २० ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. धाबा चालक हा धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री व नशा करणारे इतरही पदार्थ विक्री करीत असल्याच्या संशयावरून महिलांनी धाब्यावर हल्लाबोल करीत धाब्याला आग लावल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. महिलांनी धाब्याची तोडफोड करून आग लावल्याने धाबा काही प्रमाणात जळाला आहे. एवढेच नाही तर धाबा चालकालाही महिलांनी चांगलाच चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर महिलांनी पोलिस स्टेशन गाठले. धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या धाबा चालकाविरुद्ध महिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे.
मंदर गावाजवळ निलगिरी वनाच्या अगदीच विरुद्ध बाजूला बब्बू भैय्या का धाबा या नावाने धाबा सुरु करण्यात आला. या धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री व इतरही नशा करणारे पदार्थ विक्री होत असल्याची अनेक दिवसांपासून ओरड सुरु होती. अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण मुले व मजुरदारवर्ग दारूच्या आहारी जाऊ लागला. गावकरी कामधंद्यांना जाण्यापूर्वी नशेत तर्रर्र होईस्तोर दारू ढोकसायचे. त्यामुळे महिलांमध्ये कमालीचा संताप दिसून येत होता. शेवटी महिलांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी रुद्र अवतार धारण करीत धाब्यावर हल्लाबोल केला. गावातील ६० ते ७० महिला धाब्यावर चालून गेल्या व त्यांनी धाबा चालकाला चांगलाच चोप दिला. एवढ्यावरच या महिला थांबल्या नाही तर अवैध दारू विक्रीचा संशय असलेल्या या धाब्याला त्यांनी अक्षरशः आगीच्या स्वाधीन केले. महिलांनी लावलेल्या आगीत धाबा हा काही प्रमाणात जळाला आहे. या धाब्यावर अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा महिलांना दाट संशय होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलल्या जात आहे. धाब्याला आग लावल्यानंतर संपूर्ण महिला पोलिस स्टेशनवर धडकल्या. त्यांनी धाबा चालकाविरुद्ध पोलिस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली आहे. आता यावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments: