प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गंगा विहार येथिल प्रवेशद्वाराजवळ अडवून दरोडेखोरांनी एका व्यवसायिकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची खळबळजनक घटना १९ ऑगस्टला रात्री ९.२२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर रोकड घेऊन दुचाकीने घराकडे जात असलेल्या व्यवसायिकाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळील रोख रक्कम असलेली पिशवी व गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून दरोडेखोरांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने व्यवसायिक प्रचंड घाबरला. त्याने लगेच आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. नंतर घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगवान हालचाली केल्या. शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दरोडेखोरांच्या मागावर पोलिस पथकं पाठविण्यात आली. मात्र अद्याप दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
शहरातील ठाकुरवार कॉम्प्लेक्समध्ये अंकुश मोबाईल शॉपी हे प्रसिद्ध मोबाईल विक्रीचे दुकान आहे. अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश बोढे हे रात्री शॉपी बंद करून घराकडे जात होते. त्यांच्या जवळ व्यवसायातून जमा झालेली ६ लाख रुपयांची रोख रक्कम होती. रोकड घेऊन ते व त्यांचा नातेवाईक दुचाकीने गंगा विहारकडे जात असतांना त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोरांनी त्यांना गंगा विहार जवळ रस्त्यात अडविले. अंकुश बोढे यांच्या पोटाला चाकू लावून दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील ६ लाख रुपये रोख असलेली पिशवी बळजबरीने हिसकावली. तसेच अंकुश बोढे यांच्या गळ्यातील चैन देखील हिसकावून दरोडेखोरांनी पळ काढला. या लुटपातीत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. कार मधून आलेले हे चारही दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दरोडेखोरांनी काही कळण्याआधीच बेसावध असलेल्या अंकुशला गंगा विहाराच्या गेट जवळ अडवून चाकूच्या धाकावर त्यांना लुटले. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहरानी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तसेच जवळपासच्या सर्वच पोलिस स्टेशनला याबाबत सूचना दिल्या. दरोडेखोरांच्या मागावर वेगवेगळ्या मार्गाने पोलिस पथकं पाठविण्यात आली. मात्र अद्याप दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहराबाहेरील चौकांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही दरोड्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यावरून चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे परत एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी हे स्वतः दरोडेखोरांचे लोकेश मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.


No comments: