श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात भरगच्च कार्यक्रम, लखबीर सिंग लख्खा यांची भक्ती संध्या प्रमुख आकर्षण
प्रशांत चंदनखेडे वणी
श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीच्या वतीने शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आयोजित काण्यात आला आहे. २१ ते २७ ऑगस्ट पर्यंत हा सोहळा चालणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्या दरम्यान विविध स्पर्धाही रंगणार आहेत. तसेच आकर्षक अशी शोभायात्रा देखील शहरातून काढण्यात येणार आहे. हा संपूर्ण सोहळा श्री विनायक मंगलकार्यालय व अमृत भवन येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिद्ध गायक लखबीर सिंग लख्खा यांचा बहारदार कार्यक्रम या सोहळ्याचं खास आकर्षण असणार आहे. २२ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता शासकीय मैदानावर लखबीर सिंग लख्खा यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आठवडाभर चालणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी केले आहे.
मंगळवार दि. २१ ऑगस्टला "जय बोला प्रिय पत्नीची" या विनोदी कौटुंबिक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. श्री विनायक मंगलकार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ऑगस्टला शासकीय मैदानावर लखबीर सिंग लख्खा यांचा भक्ती संध्या हा कार्यक्रम होणार आहे. २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता श्री विनायक मंगलकार्यालय येथे सुप्रसिद्ध हास्य सम्राट प्रा. महेंद्र गणपुते यांचा "हास्य नगरी का धमाल" हा एकपात्री नाट्य प्रयोग होणार आहे. २४ ऑगस्टला सायं. ६ वाजता श्री विनायक मंगल कार्यालय येथे कौटुंबिक नाटक "संध्याछाया" चे सादरीकरण होणार आहे. तर रविवार २५ ऑगस्टला सायं. ६ वाजता अमृत भवन येथे राज्यातील नामवंत कवींचे कवी सम्मेलन रंगणार आहे.
विविध स्पर्धांचे देखील आयोजन
शनिवार दि. २४ ऑगस्टला दुपारी २ वाजता अमृत भवन येथे बाल कृष्ण दर्शन (कृष्ण व महाभारतातील पात्र) ही वेशभूषा स्पर्धा होणार असून दुपारी ३ वाजता डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डेकोरेशन स्पर्धेसाठी कृष्ण झुला, कृष्ण मटकी सजावट हा विषय राहणार आहे. २५ ऑगस्टला दुपारी २ वाजता धार्मिक व देशभक्तीवर आधारित सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. दुपारी ३ वाजता १ मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा १ ते ६, ७ ते ११, व १२ ते १८ वर्षे वयोगटात होणार आहेत.
सोमवार दि. २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा होणार आहे. सकाळी ६ वाजता श्रीकृष्ण पालखी निघणार आहे. ही पालखी चोरडिया यांच्या निवासस्थानापासून तर श्रीकृष्ण मंदिरापर्यंत जाईल. सायं. ६ वाजता सुंदरकाड पाठ व जप होणार आहे. यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रूपांतरण सादर करण्यात येणार आहे. रात्री १० वाजता अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार असून यामध्ये अभिषेक व श्रीकृष्ण शृंगार तथा बालगोपाल दर्शन व मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्य शोभायात्रेने जन्मोत्सवाची सांगता
मंगळवार दि. २७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता अमृत भवन येथे गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. यात विविध देखावे, आकर्षक सजावटी, वाद्य वृंद पथक हे खास आकर्षण राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे कुणाल चोरडिया व विजय चोरडिया यांच्या कडून करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.


No comments: