Latest News

Latest News
Loading...

दरोडा प्रकरणात मारेगाव येथून दोघांना अटक, इतरही आरोपींच्या अटकेकरिता पोलिस पथक रवाना

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील गंगा विहार प्रवेशद्वाराजवळ एका व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. १९ ऑगस्टला रात्री ९.२२ वाजताच्या सुमारास घडली. कार मधून आलेल्या चार लुटारूंनी व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याला गंगा विहारजवळ रस्त्यात अडविले. पोटाला चाकू लावून त्याच्या जवळील ६ लाख रुपये रॊख रक्कम असलेली पिशवी हिसकावली. तसेच त्याच्या गळ्यातील सोनसाखळीही जबरदस्तीने ओढून दरोडेखोरांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने व्यावसायिक प्रचंड घाबरला. त्याने लगेच आपल्या भावाला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी वेगवान हालचाली करीत चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव जाणारी निळ्या रंगाची कार आढळून आल्याने पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकाबंदी केली. तसेच शहरातील प्रत्येक चौक व शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून तपासण्यात आले. एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी हे या प्रकरणावर जातीने लक्ष घालून आहेत. त्यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत दरोड्याचे विविध अँगल तपासले आहेत. अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मारेगाव येथून दोघांना ताब्यात घेतले. गणेश दत्ता चौघुले (२४) व शेख सलिम शेख हुसेन (२६) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली असून दरोड्यातील इतरही आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

शहरातील प्रसिद्ध अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश चिंतामणी बोढे हे नेहमी प्रमाणे शॉपी बंद करून दुचाकीने घराकडे जाण्यास निघाले. त्यांच्या सोबत त्यांचा साळाही होता. त्यांच्या जवळ व्यवसायातून गोळा झालेली ६ लाख रुपयांची रोख रक्कम होती. ते दोघेही गंगा विहार गेट जवळ पोहचत नाही तोच मागून भरधाव येणारी निळ्या रंगाची कार त्यांच्या दुचाकीला आडवी झाली. कार मधून चार जण खाली उतरले व त्यांनी अंकुश यांच्या पोटाला चाकू लावून त्यांच्या जवळील रोकड असलेली पिशवी बळजबरीने हिसकावली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीही त्यांनी ताकदीने ओढली. मात्र अर्धी सोनसाखळी तुटून खाली पडली व अर्धी त्यांच्या हाती लागली. त्यांनी सहा लाख रुपये रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला व ते पसार झाले. हा संपूर्ण घटनाक्रम एवढा झटपट झाला की अंकुश बोढे यांच्या मदतीकरिता कुणाला धावूनही येता आलं नाही. 

अचानक घडलेल्या या घटनेने भयभीत झालेल्या अंकुश यांनी लगेच आपल्या भावाला फोन करून ही माहिती दिली. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरोड्याची माहिती मिळताच एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जवळपासच्या पोलिस स्टेशनलाही घटनेची माहिती देण्यात आली. सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. विविध अँगलने तपास करण्यात येत असतांनाच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने २० ऑगस्टला दुपारी मारेगाव येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच इतरही दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिस पथकं रवाना करण्यात आली आहे. लवकरच दरोडेखोरांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

No comments:

Powered by Blogger.