साहेब, शेतात जाणे अवघड झाले, पांदण रस्त्याची दुरुस्ती करून द्या हो, आसोला येथील हवालदिल शेतकऱ्यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
पावसाळा सुरु होण्यापूर्वी पांदण रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना चिखल तुडवीत शेतात जावे लागत आहे. शेतात जाणे येणे करतांना मोठी कसरत करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमधून प्रशासनाविषयी कमालीचा असंतोष खदखदत आहे. यवतमाळ तालुक्यातील आसोला या गावातील पांदण रस्त्यावर पंचायत समितीने टाकलेल्या मातीमुळे दलदल तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हा पांदण रस्ता जाण्या येण्या योग्यच राहिलेला नाही. रस्त्यावरील चिखलात गुडघ्यापर्यंत पाय फसतात. त्यामुळे शेतकामात मोठे अडथळे निर्माण होऊ लागले आहे. पांदण रस्त्यांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असतांना देखील प्रशासकीय स्तरावर त्याचं योग्य नियोजन केलं जात नसल्याने शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतात जाण्याची वाटच बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पांदण रस्त्याअभावी त्यांची शेतातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे आसोली शेत शिवराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून देण्याची मागणी आसोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ वरून ३५ किमी अंतरावर आसोला हे गाव आहे. आसोला ते पांढुर्णा हा ३ किमी रस्ता शासकीय रेकॉर्ड नुसार सावर पांदण हद्द कायम करून सन २०१७-१८ साली पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत या पांदण रस्त्याचा अहवाल तयार करण्यात आला. मनरेगा योजनेतून नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र पांदण रस्त्याचे खडीकरण व पक्के बांधकाम न करता या रस्त्यावर केवळ माती टाकण्यात आली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. रस्त्यावर एकप्रकारे दलदल तयार झाला आहे. या पांदण रस्त्यावरील चिखलात गुडघ्यापर्यंत पाय फसतात. त्यामुळे कास्तकारांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर जवळपास ५०० ते ६०० एकर शेतजमीन आहे. जिल्हा परिषदेचा पाझर तलाव आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची नविन विहीरही याच रस्त्यावर आहे. शेतात वन्य प्राणी हौदोस घालत असल्याने शेतकऱ्यांना दिवसाचं नाही तर रात्रीही या पांदण रस्त्याने शेतात जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावातील नागरिकांसाठीही हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. परंतु या पांदण रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीमुळे पूर्णतः दलदल तयार झाला आहे. हा रस्ता जाण्यायेण्या योग्य राहिला नाही. रस्त्यावरील चिखलातून मार्ग काढतांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणेच अवघड झाले आहे. तेंव्हा तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून शेतात जाण्याची वाट उपलब्ध करून देण्याची मागणी आसोला येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनावर नारायण राठोड, सुधिर सोनटक्के, संतोष काटोलकर, गजानन काटोलकर, गजानन राठोड, प्रेम राठोड, प्रमोद घावडे, प्रज्वल पवार, अरुण झाडे, प्रशांत कांडलकर, विजय आडे, रविंद्र राठोड, गिरीश राठोड, विलास कारोटकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments: