प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील जैताई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका इसमाने केस कलर करणारे द्रव्य प्राशन केल्याने त्याचा चंद्रपूर येथे उपचारार्थ हलवितांना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार ४ ऑगष्टला सकाळी उघडकीस आली. अनिल राजन्ना अंडलवार (५५) असे या विषारी द्रव्य प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे.
अनिल अंडलवार यांचे लालपुलिया परिसरात अनेक वर्षांपासून देशप्रेमी नामक प्रचलित हॉटेल आहे. ते या हॉटेलमध्येच रहायचे. त्यांनी शनिवारी देशप्रेमी हॉटेलमध्येच विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब हॉटेल मधील कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी अनिल अंडलवार यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती आणखीच अत्यवस्थ झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात येत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अनिल अंडलवार हे मागील काही दिवसांपासून कुठल्यातरी विवंचनेत असल्याचे बोलल्या जात आहे. अशातच त्यांनी नैराश्येतून विषारी द्रव्य प्राशन करून जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांनी असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनिल अंडलवार यांच्या पश्च्यात एक मुलगा आहे. तालुक्यात आत्महत्यांच्या घटना प्रचंड वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments: