Latest News

Latest News
Loading...

निंबाळा (बु.) गावची सामान्य कुटुंबातील मुलगी झाली पोलिस उपनिरीक्षक

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न व कठोर परिश्रम करावे लागतात. जिद्द उरी बाळगून धेय्य गाठावे लागते. गगनभरारी घेण्याकरिता इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. खडतर वाटांतूनही मार्ग शोधावे लागतात. मार्गातील अडथळेही पार करावे लागतात. यशाला गवसणी घालण्याकरिता धेय्यवादी दृष्टीकोन ठेवावा लागतो. जिद्द, चिकाटी व परिश्रम ही यशाची गुणसूत्रे आहेत. याची जोड मिळाली की यश पदरी पडल्याशिवाय राहत नाही. परिस्थितीचा बागलबुवा न करता कठीण परिस्थितीतूनही उभारणारे विद्यार्थीच यशाचे मानकरी ठरतात. वणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या विद्यार्थिनीने प्रयत्न व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत आपल्या आई वडिलांचं स्वप्न व आपलं धेय्य पूर्ण केलं आहे. दुर्गा रमेश कोल्हेकार असे या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने स्पर्धा परीक्षेत यशस्वी भरारी घेतली आहे. 

तालुक्यातील निंबाळा(बु.) येथील सामान्य कुटुंबात वाढलेल्या दुर्गाने जेमतेम परिस्थितीतून यशाचा मार्ग गाठला. एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. जीवनात एक उद्दिष्ट ठेवलं आणि ते पूर्ण करण्याचा निर्धार केला की, यशाला गवसणी घालण्याचा मार्ग आपोआप मोकळा होतो. स्पर्धेच्या या युगात आपलीही चमक दाखवायची असेल तर शैक्षणिक जीवनात स्वतःला वाहून घ्यावं लागतं. विद्यार्थी दशेत जिवतोड अभ्यास करावा लागतो. तेंव्हा कुठे यशाचा मार्ग गवसतो. रमेश कोल्हेकार यांनी मुलीच्या शिक्षणात कुठलीही कसर वा बाधा येऊ दिली नाही. दुर्गानेही वडिलांच्या कष्टाचे चीत केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कठीण परीक्षा तिने उत्तीर्ण केली. आता ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी पोलिस उपनिरीक्षक पदाची मानकरी ठरली आहे. तिने संपादन केलेल्या या यशामुळे ती सर्वांच्याच प्रशंसनेस पात्र ठरली आहे. तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

आई वडिलांनाही तिचा अभिमान व हेवा वाटावा अशी यशस्वी कामगिरी तिने केली आहे. आता ती खाकी वर्दीत झळकणार असल्याने आपल्या गावतील मुलगी कायद्याची रक्षक झाल्याचा आनंद गावकऱ्यांच्या गगनात मावेनासा झाला आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी महापुरुषाची शिकवण. कठीण परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ती खऱ्या अर्थाने सार्थक ठरविली आहे. दुर्गाने प्राथमिक शिक्षण हे निंबाळयातच घेतले. माध्यमिक शिक्षण तिने वणी येथे पूर्ण केले. नंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली, व अथक प्रयत्नातून तिने स्पर्धा परीक्षा पासही केली. आता तिची नागपूर ग्रामीणमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थी जीवनात कठोर परिश्रम घेत यशाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या दुर्गाचे लोकसंदेश न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन, व तिला पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.   



No comments:

Powered by Blogger.