प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय कर्मचारी महिलेच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढतच गेला. अनोळखी व्यक्तीच्या शब्दांच्या जाळ्यात ही महिला अलगद अडकली. नंतर त्या व्यक्तीचे तिला वारंवार फोन येऊ लागले. फोन वरील संवादातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कालांतराने त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होऊन ते अगदीच घट्ट झालं. मात्र त्या फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काही तरी वेगळच शिजत होतं. अशातच त्याने तिच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. परंतु महिलेने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी त्याने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तुझे मी काही अश्लील फोटो तयार केले आहेत, ते मी तुझ्या नातेवाईकांना पाठवतो व समाज माध्यमांवर व्हायरल करतो, अशी त्याने महिलेला धमकी दिली. तरुणाच्या या धमकीने महिला चांगलीच धास्तावली. तिला काही सुचेनासे झाले. पैशासाठी तरुण हा तिला वारंवार फोन करू लागला. शेवटी त्याच्या तगाद्याला कंटाळून महिलेने तरुणाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या सुरेंद्र पाचभाई या आरोपीवर बीएनएसच्या कलम ३०८(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

No comments: