वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची १५ दिवसांत भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन, संजय खाडे यांचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
शेतातील उभ्या पिकांत वन्य प्राणी हौदोस घालत असल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत आले असून वन्य प्राण्यांच्या हौदोस घालण्याने शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाकडून पंचनामे तर करण्यात आले पण अद्यापही लाभ न मिळाल्याने शेतकरी वर्गात कमालीचा असंतोष खदखदत आहे. वन्य प्राण्यांनी उभी पिकं लोळविल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी वन विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. १५ दिवसांत मागणीची दखल न घेतल्यास वन विभाग कार्यालयासमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संजय खाडे यांनी निवेदनातून दिला आहे.
कास्तकारांच्या उभ्या पिकांत वन्य प्राणी हौदोस घालत असल्याने उभी पिकं नष्ट होऊ लागली आहेत. शेतात वन्य प्राण्यांच्या हौदोस घालण्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊ लागलं आहे. सन २०२३-२०२४ या काळात ९९६ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं वन्य प्राण्यांनी नुकसान केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वन विभागाकडून पंचनामेही करण्यात आले. परंतु आता पर्यंत केवळ २४० शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळाली असून ७५६ शेतकरी अजूनही नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ न मिळाल्याने त्यांच्यामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांनी शेतपिकांच्या केलेल्या नुकसानीनंतर शासनाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे संजय खाडे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. संजय खाडे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न उचलून धरत वन विभागाशी संपर्क साधला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात होत असलेल्या दिरंगाई बाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वन विभागाला निवेदन देऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. १५ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास वन विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संजय खाडे यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना काँग्रेसचे पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर वऱ्हाटे, अशोक चिकटे, तेजराज बोढे, महेश वैद्य, अशोक पांडे, पी.एस. उपरे, पवन एकरे, प्रेमनाथ मंगाम, प्रफुल उपरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments: