प्रशांत चंदनखेडे वणी
रान डुकराच्या हल्ल्यात शेत मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. ११ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बेसा (लाठी) शेत शिवारात घडली. या शेत मजुराला चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. हा मजूर शेत मालकाचे बैलं शेतात चराई करीता घेऊन गेला असता रान डुकराने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. बाबाराव विठ्ठल मोते वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे असे या रान डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव आहे.
शेतात वन्य प्राणी प्रचंड धुमाकूळ घालू लागल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत आले आहेत. वन्य प्राणी शेत पिकांचे तर नुकसान करीतच आहेत, पण शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवरही वन्य प्राणी हल्ला चढवू लागल्याने त्यांच्यात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. पण वन विभागाकडून कुठलेच ठोस प्रयत्न केले जात नसल्याने शेतकरी व शेत मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. बाबाराव मोते या शेत मजुरावर रान डुकराने अचानक हल्ला चढविला. हा शेत मजूर शेत मालकाचे बैलं चराई करीता घेऊन गेला असता शेतात संचार करणाऱ्या रान डुकराने त्याच्यावर हल्ला चढविला. मजुराने रान डुकराचा हल्ला परतवून लावल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र रान डुकराच्या हल्ल्यात शेत मजुराच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या हौदोसाने शेतकरी व शेतमजूर कमालीचे धास्तीत आले असून शेतात धुडगूस या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामवासीयांमधून होऊ लागली आहे.

No comments: