Latest News

Latest News
Loading...

आई वडिलांची माफी मागून विद्यार्थिनीने घेतला जगाचा निरोप, प्रांजली जीवनाच्या परिक्षेतूनच झाली बाद

प्रशांत चंदनखेडे वणी 

वैद्यकीय क्षेत्रात करियर घडविण्याकरिता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. ११ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रांजली यशवंत राजूरकर (१७) रा. गोंडबुरांडा ता. मारेगाव असे या गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

चंद्रपूर येथील एका कोचिंग सेंटरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी ही विद्यार्थिनी तेथीलच एका वसतिगृहात राहत होती. वैद्यकीय क्षेत्रात करियर घडविण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिने नीटची तयारी सुरु केली. अपेक्षांचं ओझं शिरावर घेऊन ती पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तिच्या आत्मविश्वासाला तडा गेला. पालकांच्या अपेक्षांवर खरी उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीने मानसिक खच्चीकरणातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. सुसाईड नोटमध्ये आई वडिलांची क्षमा मागत तिने जीवनाच्या परिक्षेतूनच स्वतःचं नाव काढून घेतलं. विद्यार्थी जीवनातील आव्हाने पेलण्याऐवजी ती जीवनाच्या परिक्षेतूनच बाद झाली. इयत्ता १२ वीत शिक्षण घेतानाच नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रांजलीने अभ्यासक्रमाच्या तणावातून आत्मघाती निर्णय घेतला. तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा एकदा नाही तर अनेकदा देता येतात. पण जीवनातून बाद झाल्यानंतर कुठल्याच परीक्षा उरत नाही. विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे पण संयम सोडू नये. हतबल होऊन विसंगत निर्णय घेऊ नये. पालकांनीही आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून विद्यार्थी धैर्य गमावू लागले आहेत. 

मृत्यू पूर्वी प्रांजलीने आई वडिलांच्या नावे चिट्ठी लिहिली. त्यात तिने आई वडिलांची माफी मागितली. अभ्यासाचे खूप टेन्शन आल्याने मी जगाचा निरोप घेत आहे, असा भावपूर्ण निरोप तिने या चिठ्ठीतून आपल्या आई वडिलांना दिला. आणि मृत्यूचा फास आपल्या गळ्याभोवती आवळला.

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा या गावातील रहिवाशी असलेली प्रांजली चंद्रपूर येथे नीट स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. ती तेथीलच एका हॉस्टेलमध्ये राहायची. घटनेच्या दिवशी ती प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचे कारण सांगून शिकवणी वर्गाला गेली नाही. ती दिवसभर हॉस्टेल मधील रुम मध्येच होती. खूप वेळ होऊनही ती रूम मधून बाहेर न पडल्याने तिच्या काही मैत्रिणींनी तिच्या रूमचा दरवाजा ठोठावून तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून मैत्रिणी घाबरल्या. त्यांनी लगेच वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांनाही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा तोडला. आतमध्ये प्रांजली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नंतर ही माहिती कोचिंग व्यवस्थापकांना देण्यात आली. व्यवस्थापकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.