Latest News

Latest News
Loading...

वागदरा (नविन) येथे मुरुमाचे अवैध उत्खनन, महसूल विभागाने धाड टाकून केली जेसीबी जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरालगत असलेल्या वागदरा (नविन) येथील नैसर्गिक टेकड्या पोखरून मुरूमाचे उत्खनन करण्याचा सपाटाच लावण्यात आल्याने नैसर्गिक टेकड्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेटच परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम उत्खननाचा हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून सर्रास सुरु आहे. मात्र महसूल विभागाचे डोळे आता उघडले आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी धाड टाकून मुरुमाचे अवैध उत्खनन करणारी जेसीबी जप्त केली आहे. रामघाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील नैसर्गिक टेकड्या पोखरून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी होऊनही महसूल विभागाने याकडे नेहमी डोळेझाक केली. परंतु आता महसूल विभागाला जाग आल्याचे दिसत आहे. १३ सप्टेंबरला सायंकाळी महसूल अधिकाऱ्यांनी वागदरा शिवारात धाड टाकून अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारी जेसीबी जप्त केली आहे. 

वागदरा (नविन) गावातील रामघाट भागात मागील काही महिन्यांपासून मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरु आहे. याबाबत महसूल विभाकडे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या. नैसर्गिक टेकड्या पोखरून महाकाय जेसीबी मशीनने मुरुमाचे उत्खनन करून त्याची अवैध विक्री केली जात आहे. मुरूम तस्करी करणारे रॅकेटच परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरूम तस्करीचा हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरु असतांना महसूल विभागाला आता जाग आल्याचे दिसत आहे. वागदरा येथे अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरु असतांना मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह तेथे धाड टाकली. घटनास्थळी त्यांना एक जेसीबी मशीन मिळून आली. अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारी जेसीबी मंडळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ती तहसील कार्यालयासमोर लावली आहे. आता यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी सर्रास मुरुमाचे उत्खनन सुरु असून राजरोसपणे ट्रॅक्टरने मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे. शासनाच्या महसुलावर डल्ला मारून तस्कर मालामाल होत असतांना अधिकारी मात्र कार्यवाहीत ढिलाई दाखवत आहेत. त्यामुळे खनिजांची तस्करी तालुक्यात फळफुलाला आली आहे. एखादवेळी कार्यवाही करायची आणि नंतर अळीमिळी गुप चिळी पाळायची, हे महसूल विभागाचं नेहमीचंच झालं असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांमधून उमटू लागल्या आहेत. तालुक्यात रेती तस्करी बरोबरच आता मुरूम तस्करीकडेही तस्करांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अवैध मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने धाड टाकल्याने या कार्यवाहीकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.  


No comments:

Powered by Blogger.