राजूर येथे डेंग्यू सदृश्य आजार फोफावले, ग्रामपंचायतीने सच्छतेकडे लक्ष देण्याची ग्रा.प. सदस्यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
राजूर या गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला केरकचरा जमा झालेला दिसतो. रहिवाशी वस्तीत कचऱ्याचे ढिगारे तयार झाल्याचे पाहायला मिळतात. सताड खुल्या असलेल्या नाल्या घाणपाण्याने तुंबल्या आहेत. गटाराचे पाणी रस्त्यांवरून वाहतांना दिसते. नाल्यांमध्ये साचलेल्या घाण पाण्यात डासांची व गंभीर आजारांना आमंत्रण देणाऱ्या विषाणूंची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन नागरिकांना विषाणूजन्य आजारांची लागण होऊ लागली आहे. डासांचे व विषाणूंचे संक्रमण रोखण्याकरिता गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरणाची फवारणी करणे गरजेचे असतांना ग्रामपंचायत याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. डास व विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असतांनाही ग्रामपंचायत विषाणूजन्य आजारांची साथ रोखण्याकडे गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही..
डासअळी नाशक औषधांची फवारणी न करता निव्वळ प्रदूषणात भर घालणाऱ्या धूळ फवारण्या करून ग्रामपंचायत ठोस उपयोजनांपासून हात झटकत आहे. गावात डेंग्यू सदृश आजारांची साथ परसरली आहे. गावकरी साथीच्या आजारांनी फणफणत आहेत. पण ग्रामपंचायत मात्र साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करतांना दिसत नाही. गावात विषाणूजन्य आजार फोफावले असतांनाही ग्रामपंचायत मात्र गावकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. गावातील अस्वच्छता दूर करण्याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. नुकताच डेंग्यूने एका बालिकेचा बळी घेतला. त्यानंतरही गावात स्वच्छता मोहीम राबविण्याकडे ग्रामपंचायत डोळेझाक करीत आहे. त्यामुळे यानंतर साथ रोगाने कुणाच्या जीवाला धोका उद्भवल्यास ग्रामपंचायत याला सर्वस्वी जबाबदार राहील. तेंव्हा साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरीता गावात ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी ग्रा.प. सदस्य प्रणिता मो. असलम व बबिता सिंह यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Comments
Post a Comment