प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रगती नगर येथिल एका निवासस्थानी दरोडा टाकून घरातील मुद्देमाल लुटून नेण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न कुटुंबातीलच मुलीच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. दरोडेखोरांनी मागच्या दारातून घरात प्रवेश केल्यानंतर एका खोलीतील सामान अस्ताव्यस्त फेकले. त्याठिकाणी त्यांना काहीच हाती न लागल्याने त्यांनी दुसऱ्या खोलीचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दार तोडण्याच्या आवाजाने घरात झोपलेली मुलगी खडबडून जागी झाली. तिने आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. मुलीने प्रसंगावधान राखल्याने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरही हाय स्टॅंडर्ड झाले असून आलिशान कारमध्ये येऊन ते दरोडा टाकू लागले आहेत. सुरक्षेच्या यंत्रणा भेदून ते दाट वस्ती असलेल्या ठिकाणी दरोडा टाकण्याकरिता धजावू लागले आहेत. तिसऱ्या डोळ्यात प्रतिबिंब उमटू नये याची खबरदारी घेतांनाच दरोडेखोर हे वेगवेगळ्या युक्त्या लढऊ लागले आहेत. दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतांना चक्क हेलमेट घातले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून दरोडेखोर हे दिमाखदार असल्याचे दिसून येते. कारमधून आलेल्या दरडेखोरांनी एका व्यावसायिकाला लुटल्याची घटना ताजी असतांनाच हा राहत्या घरी दरोड्याचा धाडसी प्रयत्न झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष डोर्लीकर यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर घरातही शिरले होते. मात्र याच दरम्यान त्यांच्या मुलीला जाग आल्याने दरोडेखोर आपल्या प्रयत्नात अपयशी ठरले. मुलीने प्रसंगावधान राखल्याने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. तिने सतर्कता दाखवून दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी सुभाष डोर्लीकर यांच्या घरात प्रवेश केला. एका खोलीतून ते दुसऱ्या खोलीत जाण्याकरिता दार तोडण्याच्या प्रयत्नात असतांना सुभाष डोर्लीकर यांची मुलगी झोपेतून खडबडून जागी झाली. तिने आरडाओरड करताच दरोडेखोरांनी धूम ठोकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने डोर्लीकर कुटुंबं कमालीचं धास्तीत आलं. त्यानंतर तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी तात्काळ सुभाष डोर्लीकर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेण्याकरिता वेगवान हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
आलिशान कारमधून येऊन दरोडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांआधी आलिशान कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी मारेगाव व नांदेपेरा येथे धुमाकूळ घालत एकाच रात्रीत अनेक ठिकाणी दरोडा टाकला होता. एवढेच नाही तर मागील महिन्यात शहरातील एका व्यावसायिकाचा आलिशान कारने पाठलाग करून त्याला रस्त्यात लुटले होते. आताही करमधूनच आलेल्या दरोडेखोरांनी सुभाष डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मुलीने समय सूचकता दाखविल्याने दरोडेखोरांचे मनसुबे उधळले गेले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. कुटुंबातील सदस्य घतरातच झोपलेले असतांना दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने दरोडेखोर निर्ढावल्याचे दिसून येत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात दरोडेखोर शिरल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरु आहेत. गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सारख्या महत्वाच्या सण उत्सवाला नागरिक घराबाहेर व बाहेरगावी जातात. परंतु शहरात सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे ते कमालीचे काळजीत आले आहेत. अत्याधुनिक तंत्र प्रणालीलाही चोरटे जुमानत नसल्याचे या धाडसी घटनांवरून दिसून येत आहे. या घटनांवर रोख लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.


No comments: