Latest News

Latest News
Loading...

खाजगी फायनान्स कंपन्यांची मनमानी, वाहने ओढून नेल्यानंतरही पाठविले जात आहे समन्स

प्रशांत चंदनखेडे वणी 

मालवाहू वाहने खरेदी करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्या ग्राहकांची चांगलीच लुबाडणूक करतांना दिसत आहेत. फायनान्स केलेली वाहने ओढून नेल्यानंतरही फायनान्स कंपन्या ग्राहकांवर थकबाकी कर्जाचा बोजा लादून त्यांना चांगलंच वेठीस आणतांना दिसत आहेत. या फायनान्स कंपन्या ज्या वाहनांवर फायनान्स करतात ती वाहने एखाद दोन मासिक हप्ते थकीत झाले की अलगद उचलून नेतात. वाहने उचलून नेण्याकरिता या फायनान्स कंपन्यांकडून गुंडप्रवृत्तीचे लोकं पाठविले जातात. ते ग्राहकांशी हुज्जत घालून व दादागिरी करून वाहने उचलून नेतात. वाहने उचलून नेतांना फायनान्स कंपन्यांकडून कुणाचीही परवानगी घेतली जात नाही. नंतर या फायनान्स कंपन्या ग्राहकांवरच अवाढव्य थकबाकी काढतात. ही तथाकथित थकबाकी भरण्याकरिता ग्राहकांवर प्रचंड दबाव आणला जातो. थकबाकी वसूल करण्याकरिता फायनान्स कंपनीचे एजंट ग्राहकांना वैतागून सोडतात. फायनान्स कंपन्याही थकबाकीसाठी ग्राहकांभोवती ससेमिरा लावत असल्याने ग्राहक कमालीचे मानसिक दडपणात आले आहेत. एवढेच नाही तर फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना न्यायालयीन नोटीस व समन्स देखील पाठवले जात असल्याने ग्राहक प्रचंड नैराश्येत आले आहेत. फायनान्स कंपन्या वाहनांचे मॉडेल पाहूनच वाहनांवर फायनान्स करतात. कमीतकमी दोन वर्षे फायनान्स भरण्याचा अवधी असतांना एखाद दोन हप्ते थकले तरी या फायनान्स कंपन्या वाहने उचलून नेतात. आणि त्यानंतर ग्राहकांवरच मनमर्जी थकबाकी काढतात. फायनान्स कंपनीच्या हिटलरशाहीला वैतागलेले काही ग्राहक टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. फायनान्स कंपन्यांकडून कडून थकबाकी कर्जाचा बोजा लादण्यात आल्याने अनेक ग्राहक मानसिक विवंचनेत आले असून फायनान्स कंपनीच्या जाचामुळे ते कमालीचे नैराश्येत आले असल्याची उद्विग्नता एका ग्राहकाने बोलून दाखविली आहे. तेंव्हा फायनान्स कंपन्या ग्राहकांच्या जीवावर उठल्याचे दिसत असून या कंपन्यांच्या मनमानी धोरणांवर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

छोटी मोठी मालवाहू वाहने व ट्रक खरेदी करण्याकरिता खाजगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अनेक बेरोजगार युवक व्यावसायीक दृष्टिकोनातून मालवाहू वाहने खरेदी करतात. या वाहनांवर फायनान्स करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडून हवे तसे ऍग्रिमेंट लिहून घेतात. व्यवसायाच्या हव्यासापोटी ते फायनान्स कंपन्यांच्या प्रत्येक अटी शर्थी मानतात. मात्र नंतर व्यवसायात बरेच उतार चढाव येतात. नाईलाजास्तव एखादं किस्त ड्यू होते. नंतर या फायनान्स कंपन्यांचे पोसलेले सिज्यूर ग्राहकांना धाकदपट करून वाहने उचलून नेतात. या फायनान्स कंपन्या वाहनांवर तेवढंच फायनान्स करतात की नंतर वाहन विकून त्यांची रिकव्हरी होऊ शकेल. तसे त्यांच्याकडून ग्राहकांना सांगण्यातही येते. मात्र नंतर ग्राहकांवर भरमसाठ आऊटस्टँडिंग काढलं जातं. वाहन खरेदी करतांना ग्राहकांना आधीच मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे फायनान्स कंपनीने वाहन उचलून नेल्यानंतर त्या रक्कमेवर पाणी फेरलं जातं. उलट ग्राहकांकडूनच थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. वाहनही गेलं, वाहन खरेदीसाठी भरलेले पैसेही गेले आणि फायनान्स कंपन्या ग्राहकांवरच थकबाकी काढतात. ओढून नेलेल्या वाहनांची ते परस्पर विक्री करतात. यावेळी ग्राहकांना जराही कळविलं जात नाही. मात्र नंतर त्यांच्यावरच थकबाकीचा बोजा लादला जातो. ज्या वाहनांवर या कंपन्या फायनान्स करतात ते वाहन उचलून नेल्यानंतरही या कंपन्या ग्राहकांकडे एका मोठ्या रक्कमेची मागणी करतात. त्यांना पर्सनल लोन दिल्यागत त्यांची या कंपन्यांकडून पिळवणूक केली जात आहे. एवढेच नाही त्यांना न्यायालयाचे समन्स पाठवून त्यांना मानसिक दडपणात आणलं जात आहे. आधीच नैराश्येतून टोकाचे निर्णय घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनाहक थकबाकीचा ससेमिरा लावून सर्वसामान्यांवर दबाव आणला जात असल्याने ते विवंचनेत आले आहेत.

काही वर्षांपूर्वी तालुक्यातील काही बेरोजगार युवकांनी कोळसा वाहतुकीच्या व्यवसायात आपलं नशीब आजमाविण्याकरिता जुने ट्रक खरेदी केले होते. जवळची काही रक्कम भरून त्यांनी ट्रकवर काही रक्कम फायनान्स केली. कोळसा वाहतूक क्षेत्रात प्रचंड मेहनत घेत त्यांनी वेळेवर फायनान्स कंपन्यांचे मासिक हप्तेही भरले. व्यवसायात उतार चढाव आले तरी त्यांनी मासिक हप्ते थकीत होऊ दिले नाही. मात्र २०१०-११ साली कोल ट्रान्सपोर्ट व्यवसायात प्रचंड मंदी आली. कोल वॉशरीज अचानक बंद पडल्या. कोळसा वाहतूक पूर्णतः मंदावली. तरीही कोळसा व्यवसायात उतरलेल्या या बेरोजगार युवकांनी जमा पुंजीतून मासिक हप्ते भरले. अशातच व्यवसायात संघर्ष करणाऱ्या युवकांच्या ट्रकांचे एक दोन हप्ते थकले. तेंव्हा फायनान्स कंपन्यांनी जराही सहुलीयत न देता ट्रक उचलून नेले. दहा ते पंधरा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळजबरीने वाहने उचलून नेली. तेंव्हा त्यांना आम्ही फायनान्स केलेली वाहने आम्हाला मिळाली, तुमच्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही, असे या फायनान्स कंपन्यांकडून ठासून सांगण्यात आले होते. 

मात्र दोन ते तीन वर्षानंतर फायनान्स कंपन्यांकडून थकबाकीसाठी त्यांना फोन येणे सुरु झाले. आधीच पैशाने पूर्णतः बरबाद झालेल्या युवकांकडे थकबाकीसाठी लगदा लावण्यात आला. मात्र त्यांनी थकबाकी कशी काय असू शकते, असे प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर अवाढव्य लादलेली रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर या फायनान्स कंपन्यांनी त्यांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकविले. त्यांना वारंवार कोर्टाच्या नोटीस व समन्स बजावण्यात आले. आता ते न्यायालयाचे उंबरठे झिजवित आहेत. वाहने उचलून पंधरा ते सोळा वर्षाचा कालावधी लोटला आहे. वाहने कालबाह्य देखील झाली आहेत. पण फायनान्स कंपन्या या सर्वसामान्य युवकांवर थकबाकीसाठी आजही दबाव आणत आहेत. त्यामुळे हे युवक आता मानसिक तणावात आले आहेत. फायनान्स कंपन्यांनी वेठीस आणल्याने ते प्रचंड नैराश्येत आले असल्याचे या युवकांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे या फायनान्स कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. फायनान्स कंपन्यांनी पोलिस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेतला नकळत वाहने उचलून नेली. काही वाहनधारकांना तर त्यावेळी वाहने चोरीला गेल्याचा संशय आला होता. नंतर त्यांना कळाले की फायनान्स कंपन्यांनी वाहने उचलून नेली. आता हे सर्वसामान्य युवक कोर्ट कचेऱ्यांच्या भानगडीत अडकले आहेत. या फायनान्स कंपन्यांनी मनमानी धोरण अवलंबले असून त्यांच्या या मनमानी प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी या सर्वसामान्य युवकांकडून होऊ लागली आहे. 


No comments:

Powered by Blogger.