चक्क बहीण भावानेच रचला दरोड्याचा कट, मुख्य सूत्रधार असलेल्या बहिण भावासह पोलिसांनी पाच आरोपींना ठोकल्या बेड्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष शंकरराव डोर्लीकर या व्यवसायिकाच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जालना, वसमत व वणी येथून अटक केली आहे. या दरोडेखोरांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. बहीण भावांनी मिळून दरोड्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. काही वर्षांपूर्वी सुभाष डोर्लीकर यांच्याकडे काम करणाऱ्या युवकाचा साळा असलेल्या या तरुणाने आपल्या बहिणी सोबत मिळून दरोड्याचा मास्टर प्लॅन केला. जालना येथून त्यांनी चोरी करण्यात माहीर असलेल्या काही युवकांना बोलावून घेतले. त्यांनी पूर्ण रचनाबद्ध पद्धतीने दरोडा टाकण्याचा केलेला प्लॅन सुभाष डोर्लीकर यांच्या मुलीच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. मात्र दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताशेरे ओढण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आपली सर्व तपास यंत्रणा कामी लावून अवघ्या तीन दिवसांत पाच आरोपींना अटक केली. समंदरसिंग उर्फ बबलू रामसिंग टाक रा. गोकुळ नगर वणी, मुकिंदसिंग निक्कासिंग टाक, सावनसिंग मुकिंदसिंग टाक दोघेही रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना, सतनामसिंग गुरुमुखसिंग चव्हाण (३६) रा. वसमत तथा एक महिला रा. वणी अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होणे बाकी आहे. फरारीत असलेले आरोपी लोकेशन बदलवीत असल्याने त्यांना ताब्यात घेणे पोलिसांना कठीण जाऊ लागले आहे.
शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुभाष डोर्लीकर यांच्या राहत्या घरी ४ सप्टेंबरला मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास दरोडेखोर शिरले. त्यांनी मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र तळमजल्यावरील खोलीत त्यांच्या काहीच हाती न लागल्याने त्यांनी आपला मोर्चा वरच्या माळ्यावरील बेडरूमकडे वळविला. या बेडरूममध्ये सुभाष डोर्लीकर यांची मुलगी झोपली होती. दरोडेखोरांच्या आदळआपट करण्याने ही मुलगी झोपेतून खडबडून जागी झाली. तिला घरात कुणी तरी शिरल्याचा संशय आला. त्यामुळे ती जोरजोरात ओरडायला लागली. मुलीच्या आरडाओरड करण्याने दरोडेखोर आले त्या मार्गाने पळत सुटले. कारमध्ये बसून ते सुसाट पळाले. या सर्व दरोडेखोरांनी हेलमेट लावले होते. सुभाष डोर्लीकर यांच्या मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. मात्र या घटनेने सुभाष डोर्लीकर व त्यांचं कुटुंबं चांगलंच धास्तीत आलं. दरोडेखोरांनी धूम ठोकल्यानंतर सुभाष डोर्लीकर यांनी लगेच ही माहिती पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. एसडीपीओ व ठाणेदार यांनी वेगवान हालचाली करीत दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केली. सर्वच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सर्व तपास यंत्रणा कामी लावण्यात आली. तपासाची योग्य दिशा पकडून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच (५ सप्टेंबर) जालना येथून दोन दरोडेखोरांना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली कारही त्यांना जालना येथे बेवारस अवस्थेत आढळून आली. ती कार देखील पोलिसांनी जप्त केली. या दोनही आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दरोड्याचे मुख्य सूत्रधार वणी येथीलच बहीण भाऊ असल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी दोनही बहीण भावांना शहरातून अटक केली. महिलेचा भाऊ हा काही वर्षांपूर्वी सुभाष डोर्लीकर यांच्याकडे कामाला असलेल्या युवकाचा साळा असल्याचे समजते. तर त्याची बहीण या युवकाची बायको असल्याचे सांगण्यात येते. या पाचही दरोडेखोरांवर पोलिसांनी बीएमएसच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना १० सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल बेहेरानी, सपोनि अजय गुल्हाने, एसडीपीओ कार्यालयातील विजय वानखेडे, अमोल नुन्नेलवार एसडीपीओ पथक व पोलिस पथक करीत आहे.
आरोपींचा शोध लागल्यानंतर व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून आरोपींची नावे सांगण्यात टाळाटाळ करण्यात आली. आरोपींबाबत कुठलीच माहिती देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला. इतर आरोपी सतर्क होतील म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे यवतमाळ एलसीबी कडून आरोपींची नावे आधीच जाहीर करण्यात आली होती. पण येथिल पोलिस विभाग मात्र यापासून अनभिज्ञ होता. जिल्हा पोलिस कार्यालय व वणी पोलिस विभागातच आपसी ताळमेळ नसल्याचे यावरून दिसून आले. यवतमाळ वरून आरोपींची नावे जाहीर करण्यात आल्याचे जेंव्हा येथील पोलिसांना सांगण्यात आले तेंव्हा ते स्वतःच शॉक झाले. पोलिसांकडून आरोपींची नावं गुपित ठेवण्यात जी सतर्कता व तत्परता दाखविली जाते. तीच सतर्कता जर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात दाखविण्यात आली असती तर अशा गंभीर घटना घडल्या नसत्या. मागील काही दिवसांत अतिशय गंभीर गुन्हे घडले आहेत. छोट्या मोठ्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. दरोड्यासारखे गंभीर गुन्हे शहरात एका पाठोपाठ घडू लागले आहेत. गुन्हे घडल्यानंतर खबऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध लावून कॉलर टाईट केली जाते. पण या अपराधीक घडामोडीतून जर एखादी अनुचित घटना घडली तर याची जबादारी कुणाची. मुलीने सतर्कता दाखविली नसती तर कुठलाही प्रसंग ओढावू शकला असता. लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असता.
मागील काही दिवसांत गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांची व त्यांच्या संपत्तीची सुरक्षा धोक्यात आली आहे. गुन्हेगारांच्या हिंमती प्रचंड वाढल्या आहेत. जीविताला धोका पोहचविण्यापर्यंत ते निर्ढावले आहेत. लालपुलिया येथील सिमेंट व स्टीलच्या गोदामात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनी चौकीदाराचाच निर्घृण खून केला होता. पटवारी कॉलनी येथेही सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्याचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. मागील महिन्यात एका व्यावसायिकाला वर्दळीचे ठिकाण असलेल्या व बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या गंगा विहार परिसरात जेमतेम रात्री ९.१५ वाजता लुटण्यात आले. एवढ्या पर्यंत गुन्हेगारांच्या हिमती वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरवासी भीतीच्या सावटात आले आहेत. तेंव्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहे. मात्र अद्याप असे कोणतेच ठोस प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची अपेक्षा आता शहरवासी व्यक्त करू लागले आहेत.

No comments: