Latest News

Latest News
Loading...

तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजावरा, संजय देरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे केले स्टिंग ऑपरेशन

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे झणझणीत वास्तव एका पाहणीतुन समोर आले आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याठिकाणी आरोग्य सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याचे चित्र दिसून आले. आरोग्य सुविधा अतिशय तोडक्या असल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे केवळ नावालाच उरले असल्याचे एका स्टिंग ऑपरेशन वरून दिसून आले. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे समोर आले. कुठे डॉक्टरच हजर राहत नसल्याचे पुढे आले. तर कुठे रुग्णांना उत्तम सेवा मिळत नसल्याची बाब पुढे आली. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये रुग्णांची अतिशय गैरसोय होत असल्याचे वास्तव या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुढे आले आहे. 

कुठे तर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता शोधावा लागला. प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाण्याकरिता छोटीशी पायवाट होती, तीही काटेरी झुडपांनी वेढलेली होती. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा असलेला तुटवडा, गंभीर आजारावरील लसींची कमतरता, रुग्ण भरती ठेवण्याकरिता नसलेली व्यवस्था, योग्य उपचाराचा अभाव, गर्भवती महिलांच्या तपासणीत होणारी हयगय व प्रसूतीसाठी स्वतंत्र खोलीची नसलेली व्यवस्था हे गंभीर वास्तव शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याची गंभीर बाब या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहेत. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडलेले असतांना रुग्णांवर उपचार होईल तरी कसा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याकरिता ग्रामीण भागांना भेटी दिल्या. यातून अनेक समस्या पुढे आल्या. आरोग्याच्या समस्येने तर भीषण रूप धारण केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची पाहणी करण्याचे अभियान त्यांनी सुरु केले आहे. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून भयावह परिस्थिती पुढे आली आहे. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर येथिल खरे वास्तव संजय देरकर यांच्या डोळ्यापुढे आले. ३८ हजार लोकसंख्या असलेल्या शिरपूर या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव दिसून आला. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २३ कर्मचाऱ्यांची पदे असतांना केवळ ९ कार्मचारी येथे कार्यरत आहेत. १४ कर्मचाऱ्यांची पदं मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. कंत्राटी भरतीतील बीएएमएस दर्जाच्या डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे. कार्मचारी निवासातील संडास नादुरुस्त अवस्थेत आहे. कर्मचारी निवासाचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कर्मचारी निवासाच्या डागडुजीवर मागील चार वर्षात दोनदा निधी खर्च करण्यात आला. मात्र अवस्था जैसे थेच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन इमारत बांधण्यात येत आहे. मात्र बांधकाम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आले. याकडे तालुका आरोग्य अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देतांना दिसत नाही. 

नायगाव उपकेंद्रातही समस्यांचा अंबार दिसून आला. येथे महिलांच्या प्रसूती करीता स्वतंत्र खोली नाही. विजेची मोठी समस्या आहे. विजेची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. विजेवरील उपकरणेही उपलब्ध नाहीत. फ्रिजची व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथे सीएचओ राहत नाही. औषधांचा व लसींचा मोठा तुटवडा आहे. साधे खोकल्याचे औषधही येथे उपलब्ध नाही. संडास बाथरूमचे सांडपाणी बाहेर जाण्याकरिता मार्ग काढण्यात आलेला नाही. संडास बाथरूम अतिशय गंभीर अवस्थेत असल्याचे दिसून आले. 

बेलोरा उपकेंद्र तर भकास अवस्थेत दिसून आले. या उपकेंद्रात कर्मचारीच नाहीत. वीज पुरवठा पूर्णपणे बंद आहे. उपकेंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उपकेंद्राकडे जाणारा रस्ताच अदृश्य झाल्याचे दिसून आले. उपकेंद्राकडे जाण्याकरिता रस्ता शोधावा लागला. नंतर एक छोटी पायवाट दिसून आली. तीही काटेरी झुडपांनी वेढलेली होती. त्यातून कसाबसा मार्ग काढत उपकेंद्रांपर्यंत पोहचले असता हे उपकेंद्र भयावह स्थितीत दिसून आले. संडास बाथरूमच्या सेफ्टी टॅंकची अतिशय दुरावस्था झाली होती. संडास बाथरूम तर बांधण्यातच आले नसल्याचे दिसून आले. बेलोरा उपकेंद्रात लावलेली स्टाईल पूर्णपणे उखडली होती. हे प्राथमिक उपकेंद्र नसून खंडार असल्याचे भासत होते. उकनी उपकेंद्राचीही अवस्था काही वेगळी नाही. उपकेंद्राची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. पडक्या अवस्थेत ही इमारत असून या इमारतीची पुनर्बांधणी करण्याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आणि औषधांचाही मोठा तुटवडा दिसून आला. आरोग्य सुविधांचा पूर्णतः अभाव असून आरोग्यविषयक साहित्यांचीही कमतरता दिसून आली. 

भालर उपकेंद्राचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. भालर उपकेंद्राला संजय देरकर यांनी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास भेट दिली. भालर उपकेंद्र बंद होते. त्यामुळे यासंदर्भात गावकऱ्यांशी संवाद साधला असता गावकऱ्यांनी या उपकेंद्राची पोलखोल केली. उपकेंद्रात आरोग्यच्या सुविधा तोडक्या असून रात्री ८ वाजतानंतर या उपकेंद्रात उपचारच मिळत नसल्याचे वास्तव गावकऱ्यांनी संजय देरकर यांच्यापुढे मांडले. रात्री ८ नंतर रुग्णांना दवाखान्यात एन्ट्रीच मिळत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रगती बोन्डे या जाहीरपणे असे म्हणत असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन किती सजग आहे. हे या स्टिंग ऑपरेशन वरून दिसून आले. आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे कुठलेच प्रयत्न करण्यात आले नसल्याचे वास्तव संजय देरकर यांनी केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. 

या स्टिंग ऑपरेशन अभियानात शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्यासह माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, तालुका प्रमुख रवि बोढेकर, माजी प.स. सभापती अनिल राजूरकर, संभाशिव मत्ते, जीवन डवरे, तुळशीराम बोबडे, संजय देठे, लुकेश्वर बोबडे, सरपंच गणेश डाहुले, जगदीश बोरपे, प्रितम बोबडे, विठ्ठल ठाकरे, राजेंद्र इद्दे, आकाश आसुटकर, प्रशांत बलकी, डॉ. जगन जुनगरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   


No comments:

Powered by Blogger.