Latest News

Latest News
Loading...

लुटपातीचा सिक्वल २, दीप्ती टॉकीज परिसरात परत दोघांना लुटले, पोलिसांनी काही तासांतच चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

आदिलाबाद वरून वणीला खाजगी कामानिमित्त आलेल्या युवकांना दीप्ती टॉकीज परिसरात दोन चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना ३० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून सायंकाळी या दोन्ही अट्टल चोरट्यांना अटक केली. यातील एक चोरटा आठ दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी याच परिसरात बाहेर गावावरूनच आलेल्या एका युवकाला लुटल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच परत बाहेर गावावरूनच आलेल्या दोन मित्रांना चोरट्यांनी टार्गेट केले. नेमक्या याच परिसरात लुटपातीच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक याठिकाणी सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे याठिकाणी खाजगी काम आटोपण्याकरिता येणाऱ्या युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरातील दीप्ती टॉकीज परिसरात आदिलाबाद वरून काही कामानिमित्त आलेल्या दोन युवकांना रस्त्यात थांबवून लुटले. गंगाधर नारायण मुरारी (२९) व त्याचा मित्र शिवराम हडप्पा लोनाळे (३५) हे दोघेही दीप्ती टॉकीज परिसरातुन जात असतांना त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना रस्त्यात अडविले. दोघांनाही धाकदपट करून रस्त्याच्या बाजूला नेले. तेथे त्या दोघांनाही धमकावून चोरट्यांनी गंगाधर याच्या खिशातील २२०० रुपये व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. घडलेल्या घटनेने प्रचंड भयभीत झालेल्या युवकांनी पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरटयांनी रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अजय विनायक यमूलवार (२०) व दिनेश रविंद्र मेश्राम (२२) दोघेही रा. खडबडा मोहल्ला अशी या पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. यातील अजय यमूलवार हा आठ दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हे दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.