प्रशांत चंदनखेडे वणी
वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरालगत असलेल्या बोधे नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २८ सप्टेंबरला घडली. धिरज कुमार शुक्ला (२४) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्ला कुटुंबं हे मागील २० वर्षांपासून चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास आहे. या कुटुंबातील धिरज शुक्ला हा तरुण आपल्या वडिलांचं वर्ष श्राध्द करून वाराणसी वरून ट्रॅव्हल्सने नागपूरला येत असतांना मध्य प्रदेशातील मैहर शहराजवळ ट्रॅव्हल्स उभ्या ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात धिरज याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतक धिरज याचे वडील मिथलेश शुक्ला यांचेही दोन वर्षांपूर्वी अपघातातच निधन झाले होते. त्यांचं लालपुलिया परिसरातील श्रध्दा बियरबार जवळ असलेलं किराणा दुकान त्यांच्या निधनानंतर धिरज हाच सांभाळायचा. त्यांची शुक्ला टूर्स अँड ट्रॅव्हल या नावाने कंपनी देखील आहे. काही दिवसांपासून कुटुंबातील वातावरण अस्थिर झाल्याने धिरज याला धर्म पंडिताने वडिलांच्या आत्म्याची शांती करण्याचा संदेश दिला. त्यानुसार धिरज हा वाराणसी येथे वडिलांच्या आत्मशांतीसाठी हवन करण्याकरिता गेला होता. तेथील सर्व सोपस्कार पार पाडून तो प्रयागराज नागपूर ट्रॅव्हल्सने नागपूर येथे येण्याकरिता निघाला. दरम्यान भरधाव ट्रॅव्हल्स मैहर शहराजवळ उभ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार झाले. तर २४ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातात ठार झालेल्या प्रवाशांमध्ये धिरज शुक्ला याचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. धिरज हा लालपुलिया परिसरातील मस्जिद जवळ कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याच्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धिरज याचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता लालपुलिया परिसरात पसरताच परिसरातून हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे. अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ असा हा तरुण होता. वडिलांचा व्यवसाय तो पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याच्यावर काळाने घाला घातला. वडिलांची आत्मशांती करून परतणाऱ्या धिरजलाच काळाने हिरावून घेतले .

No comments: