प्रशांत चंदनखेडे वणी
सात महिन्यांची गर्भवती असलेल्या तरुण विवाहितेने घरातील खोलीत गळफास घेऊन आत्त्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या तरुणीचा एक वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. मात्र एक वर्षाच्या संसारातच तिने टोकाचे पाऊल उचलल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतांनाच मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यातील नवरगाव येथिल पायल या तरुणीचा परसोडा येथील गौरव उरकुडे या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. पायल व गौरव हे प्रेमबंधनात अडकल्यानंतर त्यांनी लग्न केले. काही दिवस प्रामाणिक संसार केल्यानंतर गौरव तिचा छळ करू लागला. एवढेच नाही तर सासू सासरेही तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जायचा. तिला माहेरवरून एक लाख रुपये आणण्याकरिता पती व सासू सासऱ्यांनी तगादा लावला होता. अशी तक्रार मुलीच्या आईने मुकुटबन पोलिस स्टेशनला दिली आहे. ११ सप्टेंबरला जावई व मुलगी घरी आल्यानंतर पायलला ५० हजार रुपये दिल्याचेही पायलच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. पती व सासू सासऱ्याच्या छळाला कंटाळूनच तिने गर्भार अवस्थेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे मृतक पायलच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
पायल वणी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अशातच तिची मैत्री कु. निकिता उरकुडे हिच्याही झाली. नंतर निकिताने आपल्या भावाशी पायलची ओळख करून दिली. नंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पायल पेपर असल्याचे कारण सांगून वणीला गेली. मात्र नंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा दोन दिवस शोध घेतला. मात्र नंतर त्यांना मुलीने गौरव सोबत मंदिरात लग्न केल्याचे समजले. पायल ही प्रेम बंधनातून विवाह बंधनात अडकल्यानंतर काही दिवसांतच प्रेम ओसरायला लागलं. प्रेमाच्या रुपेरी दुनियेतील भयावह वास्तविकता पायल हिला कळायला लागली. सोनेरी स्वप्न किती दुःखदायी असतात याची तिला जाणीव व्हायला लागली. ज्याच्यावर जीव भाळला तोच जीवावर उठेल अशी कल्पनाही कधी पायलच्या मनाला शिवली नसेल. प्रेम विश्वात दुःखदायी वेदना मिळेल हा विचारही न केलेल्या पायलचा तिच्या सख्यानेच भ्रमनिरास केला. प्रेमातून संसार थाटल्यानंतर त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. प्रेमाच्या भाषेतही त्याच्या खूप फरक पडला. काही महिन्यातच त्यांच्यात खटके उडू लागले. गौरव हा पायलशी कठोरपणे वागू लागला. तिला दुसरं लग्न करण्याची धमकी देऊ लागला. माहेर वरून एक लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावू लागला. त्यातल्यात्यात प्रेमाच्या संसाराला त्याने संशयाचं ग्रहण लावलं.
पायल ही गर्भवती असल्याचंही भान गौरवने ठेवलं नाही. गर्भार अवस्थेत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सततचा छळ नंतर तिला असह्य होऊ लागला. पती व सासू सासऱ्याच्या अनन्वित छळाला कंटाळून तिने मायेचा गळा घोटत गर्भार अवस्थेतच मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. प्रेमविवाहाचा असा हा दुःखद शेवट झाला. संसाराची सुख स्वप्न रंगविलेल्या पायलने शेवटी मृत्यूला कवटाळले. सात महिन्यांची गर्भवती असतांना तिने आत्मघात केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पायलच्या आत्महत्येवरून विविध प्रश्न उपस्थित होत असतांनाच पायलच्या आईने पायलला सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुकुटबन पोलिस स्टेशनला नोंदविली. पती व सासू सासऱ्याच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याच्या सिता गजानन चार्लीकर (४०) या विवाहितेच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी पती गौरव मारोती उरकुडे (२४), सासरा मारोती बापूराव उरकुडे (५०), सासू मालुबाई मारोती उरकुडे (४५) व नणंद कु. निकिता मारोती उरकुडे (२०) यांच्यावर पायल गौरव उरकुडे (२०) या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बीएनएसच्या कलम १०८, ८५ , ३५२, ३५१ (२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आत्महत्या प्रकरणाचा आव्हानात्मक तपास सपोनि प्रवीण हिरे करीत आहे.


No comments: