प्रशांत चंदनखेडे वणी
शिक्षकानेच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना कोरपना येथे घडली. १ ऑक्टोबराला ही घटना उघडकीस आली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे कोरपना येथे तीव्र पडसाद उमटले आहेत. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून कोरपना पोलिसांनी नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल लोडे असे या वासनांध शिक्षकाचे नाव आहे.
अमोल लोंडे हा कोरपना येथीलच एका खाजगी शाळेत शिक्षक आहे. शाळेत अतिरिक्त शिकवणी वर्ग घेण्याच्या नावाखाली त्याने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा एरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेत अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन हा शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचा. याच काळात त्याने या विद्यार्थिनीला आपल्या वासनेचा शिकार केले. भीती पोटी तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला नाही. या शिक्षकाने याबाबत कुठे वाच्यता केल्यास कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने ही विद्यार्थिनी प्रचंड घाबरली होती. मात्र मंगळवारी (१ऑक्टोंबर) हा प्रकार विद्यार्थिनीच्या वडिलांच्या कानावर पडला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली असता हे भयावह वास्तव पुढे आले. वडिलांनी लगेच मुलीला घेऊन कोरपना पोलीस स्टेशन गाठले. आणि त्या नराधम शिक्षकाविरुद्ध रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी वडिलांच्या तक्रारी वरून अमोल लोडे या शिक्षकावर बिएनएसच्या कलम 376 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दारासिंग राजपूत करीत आहे. मात्र शिक्षकानेच विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आल्याने कोरपना येथे या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे.


No comments: