Latest News

Latest News
Loading...

तालुक्यात रेती तस्करी जोमात, शिरपूर पोलिसांनी पकडला रेती चोरी करणारा ट्रॅक्टर

प्रशांत चंदनखेडे वणी 

विना परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास रेती आढळून आली. कवडशी शिवारातील निर्गुडा नदी पात्रातून रेतीची चोरी करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून पुढे आले आहे. पोलिसांनी विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर व १ ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला असून वाळू चोरी करणाऱ्या प्रशांत देवराव बोन्डे (३५) रा. पुनवट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही १ ऑक्टोबरला पहाटे ४.३० वाजता करण्यात आली. 

तालुक्यात गौण खनिज चोरीला अक्षरशः उधाण आले आहे. वाळू माफिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. महसूल विभागाच्या मधुर संबंधांमुळे रेती तस्कर बिनधास्त झाले आहेत. शासनाच्या महसूलवार डल्ला मारून वाळू माफिया सर्रास रेती चोरी करतांना दिसत आहेत. त्यांना पाठबळ कुणाचे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. रेती तस्करीतून तस्कर मालामाल होत असतांना संबधित अधिकाऱ्यांचेही हित साधले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रात्रीच्या काळोखात व अगदी पहाटे वाळू माफियांचे रेती तस्करीचे खेळ चालतात. महसूल विभाग यापासून अनभिज्ञ आहे की डोळेझाक करीत आहे, हेच कळायला मार्ग नाही. रेतीघाट बंद असतांनाही शहरात ठिकठिकाणी रेतीचे साठे दिसत आहेत. वणी मुकुटबन मार्गावरील रेल्वेच्या पुलाखालून जातांना लागणाऱ्या फार्महाउस जवळ रेतीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. तेथून रोज रात्री ट्रॅक्टरने रेती उचलली जाते. ही रेती नंतर काळ्या बाजारात विकली जाते. रेतीचा सर्रास काळाबाजार सुरु असतांना महसूल विभागाने काळा चष्मा लावल्याचे दिसून येत आहे. 

ठाणेदार माधव शिंदे यांच्या आदेशावरून शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाला पुनवट-कवडशी मार्गाने एक ट्रॅक्टर भरधाव जातांना दिसला. पुनवट कवडशी मार्गावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पाठलाग करून अडविले. पोलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर बंद करून तो ट्रॅक्टवर बसून राहिला. पोलिसांनी चालकाला रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. कवडशी शिवारातील निर्गुडा नदीपात्रातून विना परवाना रेती आणल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. त्यावरून ट्रॅक्टर चालक हा रेती चोरी करून ती काळ्या बाजारात विक्री करीता नेत असल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतला. तसेच प्रशांत बोन्डे या ट्रॅक्टर चालकावर बीएनएसच्या कलम ३०३(२), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कार्यवाहीत पोलिसांनी जुना वापरता ट्रॅक्टर (MH २९ AK ३१६६) किंमत ३ लाख रुपये, जुनी वापरती ट्रॉली (MH २९ BP ५४२३) किंमत १ लाख रुपये व १ ब्रास रेती किंमत ५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे क्रमांक मात्र वेगवेगळे आहेत. सदर कार्यवाही ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोलिस शिपाई विजय फुल्लुके यांनी केली.




No comments:

Powered by Blogger.