Latest News

Latest News
Loading...

आपसी वादातून तरुणावर चाकू हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी 

आपसी वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला चढविण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. ७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. पाठीवर चाकूचा वार बसल्याने तरुण हा जखमी झाला आहे. मो.रजा मो.वसिर रंगरेज (२३) रा. विराणी टॉकीज मागे असे या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण हा सुलतान बिर्याणी नामक हॉटेल व्यावसायिकाचा भाचा असल्याचे समजते. 

शहरातील एकता नगर येथील सुलतान बिर्याणी नामक हॉटेलमध्ये कार्यरत असलेला मो. रजा मो. वसिर रंगरेज हा तरुण ६ ऑक्टोबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास हॉटेल बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाला असता आरोपी निकेश होले व चेतन चिकटे यांचा एकता नगर प्रवेशद्वाराजवळ त्याच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नंतर दुसऱ्या दिवशी निकेश होले व चेतन चिकटे हे दोघेही सुलतान बिर्याणी या हॉटेलमध्ये गेले. त्या दोघांनीही काल रात्री घडलेल्या प्रकाराबाबत मो. रजा याला माफी मागण्यास सांगितले. मात्र मो. रजा याने माफी मागण्यास नकार दिल्याने निकेश होले याने रागाच्या भरात जवळ असलेल्या चाकूने मो. रजा याच्यावर वार केला. सुदैवाने चाकूचा निसटता वार तरुणाच्या पाठीवर बसल्याने तरुण हा थोडक्यात बचावला. पाठीवर चाकूचा वार झाल्याने तरुण हा जखमी झाला आहे. निकेश होले याने चाकूने वार केल्यानंतर मो. रजा याने पोलिस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांसमोर आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपींना अटक केली. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी निकेश होले व चेतन चिकटे यांच्यावर बीएनएसच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१(३), नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच निकेश होले याच्या जवळील धारदार शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.