प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अनेकांना पक्षांकडून उमेदवारी मिळण्याचे वेध लागले आहे. तशा अनेकांच्या पक्षांतर्गत हालचालीही सुरु झाल्या आहेत. पक्षांकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे वाऱ्या सुरु केल्या आहेत. पक्षातील आपलं कार्य दाखविण्याकरिता पक्ष नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. पक्षाशी निष्ठावान असल्याचे पक्षश्रेष्ठींना गोडी गुलाबीने पटवून दिले जात आहे. मतदार संघात आपल्याच कार्याचा गाजावाजा असल्याचे व लोकप्रियतेत आपलंच स्थान अव्वल असल्याचे पक्षश्रेष्ठींना भासवलं जात आहे. मात्र पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी आपापली दावेदारी सांगितल्याने पक्षांसमोरही मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. काल ६ ऑक्टोबरला यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या या मुलाखती होत्या. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीच्या ठिकाणी इच्छुकांचा महामेळा दिसून आला. नवख्यांसह अनुभवी व दिग्गजही उमेदवारीसाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. वंचित कडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपापली बाजू भक्कमपणे मांडली. यात वणी विधानसभा क्षेत्रातूनही उमेदवारी मागणाऱ्यांची यादी मोठी आहे. यावेळी वंचितच्या राज्य विधानसभा समन्वयक पिंकी शेख व वंचितचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातून दोघांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी हा विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान देणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. वंचितने राजकीय क्षेत्रात आपलं प्राबल्य वाढवलं आहे. तळागाळातील जनता वंचितकडे वळू लागली आहे. वंचितला मतदान करणारा मतदार एकसंघ असून तो सर्वच घटकातील आहे. बहुजन मतदारांचा कल वंचितकडे दिवसेंदिवस वाढू लागला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने आपली ताकद दाखवून दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी राजकीय पटलावर अधोरेखित झाल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीने राजकीय पक्षांची सर्व समीकरणच बदलवून टाकली होती. गेम चेंजर म्हणून या पक्षाने आपली भूमिका बजावली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार विजयी झाले नसले तरी त्यांनी मतांची गोळाबेरीज चांगलीच जुळवली. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची गणितं बिघडली होती. निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांना टक्कर देणारा व राजकीय पक्षांची गणितं बिघडविणारा पक्ष म्हणून वंचितची धास्ती आजही कायम आहे. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता वंचित घटकांची मोट बांधून त्यांना उमेदवारी प्रधान करणारा बाळासाहेब आंबेडकरांचा हा पक्ष अल्पावधीतच एक मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यापुढेही या पक्षाकडून वंचितांना न्याय मिळेल हीच अपेक्षा मतदारांकडून बाळगली जात आहे. तेंव्हा स्वच्छ प्रतिमा व बहुजनांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, हा वंचितशी जुळलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा व जनतेचा मतप्रवाह दिसून येत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रासाठी वंचित कडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत. पक्षातील निष्ठावानांच्या यादीत आपले नाव समोर असल्याचेही पक्षश्रेष्ठींना भासविले जात आहे. वणी विधानसभा क्षेत्राचा पुरेपूर अभ्यास नसलेले नवखेही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपण कार्य तत्पर असल्याचे धडेही गिरविणे सुरु केले आहे. वंचितचा स्वार्थी प्रवृत्तीने फायदा घेणारे कमी नाहीत. आपली राजकीय पोळी शेकून घेण्याकरिता वंचितचा आधार घेणाऱ्यांनी वंचितच्या ध्येय धोरणाला खिंडार पाडली आहे. पक्ष वाढविण्यासाठी नाही तर स्वतःच नाव व स्वार्थ साधण्यासाठी अनेकांनी वंचितचा झेंडा खांद्यावर घेतला. नंतर ते इतर पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले. आजही ग्रामीण भागापर्यंत वंचितचं कार्य पोहचलं नाही. वंचितच्या कार्यकर्त्यांची अनेकांना ओळख नाही. समाजाच्या व्यथा,वेदना जाणून घेणारं व समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व अजूनही वंचितला मिळाल्याचं दिसत नाही. निवडणूका आल्या की वंचितचे झेंडे फडकायला लागतात. निवेदनांचा जागर सुरु होतो. नागरिकांच्या समस्या व प्रश्न उचलण्याची तळमळ दिसून येते. आणि उमेदवारीसाठी तडफड दिसून येते. निवडणुका आल्या की हौशे-गौशे गुडघ्याला बाशिंग बांधून मतदार संघाची सुरु करतात वारी आणि पक्षाला म्हणतात द्या उमेदवारी. असा काहीसा प्रकार वणी विधानसभा क्षेत्रात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
वंचित कडून यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. ६ ऑक्टोबरला यवतमाळ येथे संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात वणी विधानसभा क्षेत्रातून वंचितचे तालुकाध्यक्ष हरीश पाते, आदीवासी नेते सुधाकर चांदेकर आणि जेष्ठ पत्रकार तथा अनुभवी राजकारणी राजेंद्र निमसटकर यांनी उमेदवारी मागितली आहे. इच्छुकांच्या यादीत या तिघांची नावे समोर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांनीही आपापली प्रबळ दावेदारी सांगितल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तिघांनी वंचितचे आजीवन सभासदत्वही स्वीकारले आहे. यात हरीश पाते व राजेंद्र निमसटकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. हरिष पाते हे वंचितचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष आहेत. तर राजेंद्र निमसटकर यांच्यावर वंचितचा मोठा पगडा राहिला आहे.
राजेंद्र निमसटकर यांचा जनसंपर्क तगडा
राजकीय व सामाजिक क्षेत्राचा राजेंद्र निमसटकर यांना दांडगा अनुभव आहे. पत्रकारिता क्षेत्रातही ते अग्रेसर असल्याने वणी विधानसभा क्षेत्रात त्यांची ओळख आहे. सर्वच समाजातील व घटकातील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या अर्धांगिनी कोलगावच्या सरपंच आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं उमेदवारीसाठी पारडं जड मानल्या जात आहे. शेवटी पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे आता वंचित कडून कुणाला उमेदवारी मिळते याकडे कार्यकर्ते व जनतेचे लक्ष लागले आहे.




No comments: