राज्य महामार्गावरील अतिक्रमणात येणाऱ्या इमारतींवरही जेसीबी चालवा, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात सध्या रस्ते बांधकामांना वेग आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरणही केले जात आहे. गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णतः हटविण्यात आली आहे. वणी वरोरा मार्गावरील पक्क्या घरांवरही जेसीबी चालविण्यात आला. गरिबांचे निवारे उखडून टाकण्यात आले. त्यामुळे गोरगरीब बेघर झाले आहेत. त्यांना कुठली पर्यायी व्यवस्था देखील करून देण्यात आलेली नाही. वणी वरोरा राज्य महा मार्गावरील काही घरे जमीनदोस्त करण्यात आली. तर काही घरांना नोटीस बजावण्यात आली आहे. रस्ता बांधकामात अडथळा ठरणारी गरिबांची घरे जशी उध्वस्त करण्यात आली, तशी कार्यवाही साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्ता बांधकामातही करण्यात येईल काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्ता बांधकामात काही इमारती अडथळे ठरत आहेत. रस्त्यापासून काही मीटर जागा सोडूनच इमारतीचे बांधकाम करण्याचा नियम असतांना इमारती बांधतांना मात्र हा नियम पाळण्यात आलेला नाही. अंदाजे २४ मीटर रुंदीचा हा रस्ता असून या रस्त्यावरील इमारतींमुळे रस्ता बांधकामाला अडथळे निर्माण होत आहे. तेंव्हा साईबाबा मंदिरापासून नांदेपेरा चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामात अडथळे ठरणाऱ्या इमारतींवरही जेसीबी चालवून सामान न्याय करावा अशी अपेक्षा बांधकाम विभागाकडून बाळगली जात आहे. साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्त्यावरील इमारतींच्या रूपात असलेलं हे अतिक्रमण हटविण्यात न आल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणीचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या लेखी अर्जातून दिला आहे.

No comments: