Latest News

Latest News
Loading...

मटका व्यावसायिकाशी संबंध ठेवणे भोवले, शेवटी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर एसपींनी केली निलंबनाची कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. अवैध मटका व्यावसायिकाच्या कथित आरोपांवरून या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पंकज उंबरकर व विशाल गेडाम अशी या निलंबनाची कार्यवाही झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पंकज उंबरकर या पोलिस कर्मचाऱ्यावर याआधीही निलंबनाची कार्यवाही झाली होती, हे याठिकाणी विशेष. 

शहरातील एका अवैध मटका व्यावसायिकाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. या मटका व्यावसायिकाकडे हे दोन्ही पोलिस कर्मचारी मटका लावत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. जवळपास ३५ लाख रुपयांची मटक्याची उधारी या पोलिस कर्मचाऱ्यांकडे थकीत असल्याचे अवैध व्यावसायिकाचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून मटक्याची उतारी घेतल्यानंतर या दोघांनीही अवैध मटका व्यावसायिकाला उतारीचे पैसेच दिले नसल्याचा आरोप त्याने वायरल व्हिडिओतुन केला आहे. हे दोनही पोलिस कर्मचारी मोबाईल वरून मटक्याचे आकडे लावत असल्याची व्हाट्सअप चॅटिंगही वायरल झाली आहे. त्यानंतर वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राने या दोन्ही पोलिसांच्या कारनाम्यांची पोलखोल केली. हे दोघेही अल्ताफ नामक अवैध मटका व्यावसायिकाकडे मटका खेळायचे. मोबाईल वरून ते मटक्याचे आकडे लावायचे. मटका जुगार खेळतांना जवळपास त्यांच्यावर मटका व्यावसायिकाची ३५ लाख रुपयांची उधारी झाली. त्यानंतर ते दोघेही पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. व्यावसायिकाला मटका चालू न देण्याची धमकी देऊ लागले. अशी मटका व्यावसायिकाची कथित कहाणी आहे. 

विशाल गेडाम व पंकज उंबरकर हे दोन्ही पोलिस कर्मचारी मोबाईल वरून मटका लावायचे. मटक्यात पैसे हरल्यानंतर ते अवैध व्यावसायिकाला उतारीचे पैसे द्यायचे नाही. आणि मटक्याचा आकडा फसल्यानंतर पूर्ण पैसे घ्यायचे. मटका लागल्यानंतर जर थकीत रक्कम कपात करून पैसे दिले असते तर मटका व्यावसायिकावर आज कपाळावर हात ठेवण्याची वेळ आली नसती. ३५ लाखांची थकबाकी होईस्तोर मटका व्यावसायिक तोंडावर बोट ठेऊन बसला. आणि पाणी डोक्यावरून गेल्यानंतर हातपाय हलवायला सुरुवात केली. मात्र तो आता पूर्णपणे आर्थिक डोहात बुडाला आहे. आता त्याचा मटका अड्डाही दुसऱ्याने टेक ओव्हर केल्याचे बोलल्या जात आहे. 

पोलिसांचं मटका जुगार खेळणं आता त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. आणि यात मटका व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या भरडला गेला आहे. त्यामुळे आता यात कोण किती बर्बाद झाला, याचं चिंतन करण्याची वेळ मटका लावणाऱ्या व मटका घेणाऱ्यावर आली आहे. मटका व्यवसायिक थकबाकीची गणितं जुळवितांना विवंचनेत आला आहे. तर सट्टयातुन झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात नामुष्की ओढवून घेण्याची वेळ या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर आली आहे. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं दुपाटनं, या म्हणी प्रमाणे या पोलिसांवर पश्चातापाची वेळ आली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस खात्याची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या या कृत्याचा खरपुच समाचार घेत या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली. मटक्यावर नशीब आजमावण्याचा साटोऱ्यांप्रमाणे केलेला प्रयत्न त्यांच्यावरच उलटला. हे दोन्ही पोलिस कर्मचारी निलंबित झाल्याच्या चर्चेने आज शहरात रान उठले होते.  

No comments:

Powered by Blogger.