Latest News

Latest News
Loading...

चिमुकल्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अकोला येथून अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोरपना शहरातील एका खाजगी शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवार दि. १ ऑक्टोबरला उघडकीस आली. उन्हाळ्यात अतिरिक्त शिकवणी वर्ग घेण्याच्या नावाखाली त्याने हे घृणास्पद कृत्य केले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन त्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीला आपल्या वासनेचा शिकार केले. शिक्षकाच्या दुष्कृत्याला बळी पडलेल्या विद्यार्थिनीने भितीपोटी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. कारण या शिक्षकाने तशी तिला धमकी दिली होती. मात्र १ ऑक्टोबरला विद्यार्थिनीच्या पालकांना या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली असता हे भयावह वास्तव पुढे आले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून त्याला अकोला येथून अटक केली आहे. अमोल लोडे असे या नराधमाचे नाव आहे. विद्यार्थीनीवरील अत्याचाराच्या या घटनेचे कोरपना येथे तीव्र पडसाद उमटले. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने त्यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता निर्माण केली जात आहे. शासन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपायोजना आखत असतांनाही महिला मुलींवरील अत्याचार मात्र कमी होतांना दिसत नाही. 

एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे त्याच शाळेतील शिक्षकाने अतिरिक्त शिकवणी वर्ग घेण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केले. उन्हाळ्यात (मे महिना) अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलविणाऱ्या शिक्षकाची या विद्यार्थिनीवर वासनांध नजर पडली. नंतर शाळेतच तिला धाकदपट करून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास तुझ्या आई वडिलांना जीवानिशी ठार मारेन, अशी धमकी त्याने या चिमुकलीला दिली. त्यामुळे भितीपोटी विद्यार्थिनीने शिक्षकाकडून करण्यात आलेला लैंगिक अत्याचार निपुटपणे सहन केला. मात्र १ ऑक्टोबरला विद्यार्थिनीच्या पालकांना या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यामुळे पालकांनी विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. 

शिक्षकाने केलेल्या दुष्कृत्याने प्रचंड संतापलेल्या पालकांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर शिक्षकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र शिक्षक अटकेच्या भीतीने पसार झाला होता. परंतु पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध घेऊन त्याला अकोला येथून अटक केली. अमोल लोडे या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करून शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. त्यामुळे त्याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. अमोल लोडे हा कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता. या घटनेनंतर त्याला पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. मात्र त्यानं केलेलं कृत्य हे अतिशय निंदनीय आहे. 

गुन्हेगार हे कुठल्याही जात, धर्म, पंथ व पक्षाचे असो ते केवळ गुन्हेगार असतात. त्यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्याकडे जात, धर्म, पंथ व पक्ष म्हणून पहायला नको. गुन्हेगाराला अमुक जातीचा, धर्माचा व पक्षाचा न संबोधता त्याला केवळ गुन्हेगार म्हणून कठोर शासन झालं पाहिजे. एका व्यक्तीच्या दुष्कृत्यामुळे जात, धर्म, पंथ किंवा पक्ष बदनाम व्हायला नको. घरातील असो की पक्षातील एखादा व्यक्ती अनैतिक वळणावर वळत असेल तर कुटुंबं किंवा पक्षावर ताशेरे ओढले जातात. पण त्यांनाही त्या व्यक्तीचं कृत्य अनपेक्षित असतं. हा शिक्षक एका पक्षाशी जुळला असल्याने त्याच्या घृणास्पद कृत्यामुळे पक्षाला टार्गेट करण्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती लागलं आहे. मात्र पक्ष आरोपींना कधीच पाठीशी घालत नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, ही त्या पक्षाचीही भूमीका असते.  



No comments:

Powered by Blogger.