प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या वणी तालुका अध्यक्षपदी पेटूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण झाडे यांची निवड करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला पंचायत समितीच्या बी.आर. जी. एफ. सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. यात सर्वानुमते प्रविण झाडे यांना महाराष्ट्र सरपंच संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र सरपंच संघटनेचे मावळते तालुकाध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या अध्यक्षीय कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्याने संघटनेच्या नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या संदर्भात पंचायत समितीच्या बी.आर. जी. एफ. सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे, विदर्भ अध्यक्ष ऍड. देवा पाचभाई हे उपस्थित होते. तर सरपंच संघटनेच्या वतीने ऍड. रुपेश ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तुकाराम माथनकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघटनेची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात पुढील कार्यकाळासाठी प्रविण झाडे यांची सरपंच संघटनेच्या वणी तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर इतर कार्यकारणीचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बैठकीला तुकाराम माथनकर, हेमंत गौरकार, प्रकाश बोबडे, राजू इद्दे, निलेश पिंपळकर, अजय कवराशे, गीता पावडे, तात्याजी पावडे, परशुराम पोटे, कैलास पिंपराडे, प्रशांत भोग, अरुणा जेणेकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या पुढील कार्यकाळासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये तालुकाध्यक्ष प्रविण झाडे यांच्यासह सचिव गिता उपरे (सरपंच लालगुडा), कार्याध्यक्ष अनिल देऊळकर, उपाध्यक्ष मंगेश काकडे, विद्या पेरकावार (सरपंच राजूर), कल्पना टोंगे, नागेश धनकसार (सरपंच कायर), सरचिटणीस पुजा बोढाले, स्वाती झाडे, गणेश टेकाम, ज्योती माथुलकर, संघटक रंजना बांदुरकर, सल्लागार ऍड.दिलीप परचाके यांचा समावेश आहे.

No comments: