प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरासह तालुक्यात ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शोषित पीडित समाजाच्या उत्क्रांतीचं प्रतिक म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे. जातीय गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला समानतेची वागणूक मिळवून देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजीवन संघर्ष केला. त्यांनी आपलं अख्ख आयुष्य बहुजनांच्या उत्थानासाठी वाहिलं. जातीय निर्मूलनाकरिता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र सामाजिक विचारधारेत परिवर्तन होत नसल्याचे पाहून बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे स्मरण म्हणून देशासह संपूर्ण जगात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ दरवर्षी प्रमाणे या वर्षीही धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रेल्वे कॉलनी व गौरकार कॉलनी परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व मध्य रेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत भगवान बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण व दीप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. नंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज व देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दीना विषयी विस्तृत माहिती दिली. त्यानंतर महिला उपासिकांनी सुरेख आवाजात बुद्ध भीम गीते गायली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत चंदनखेडे यांनी केले.
कार्यक्रमाला मंजुळाबाई पाटील, मायाताई चंदनखेडे, चंद्रकला बोरकर, रेखा पाझारे, ज्योती गरपाल, शोभा भगत, इंदु पळवेकर, संगीता नगराळे, छबू भगत, साधना धवन, नितु धवन, मोंटू नगराळे, राहुल चंदनखेडे, हरिष गरपाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत चंदनखेडे, राहुल चंदनखेडे, मोंटू नगराळे, प्रविण भगत, अनिल भगत यांनी सहकार्य केले.

No comments: