प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. युवक रोजगारासाठी वणवण भटकत आहेत. रोजगार मिळत नसल्याने युवावर्ग नैराश्येत आला आहे. युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता लोकप्रतिनिधींकडून कुठलेच प्रयत्न करण्यात आले नाही. मात्र आपण आमदार झाल्यावर सर्वप्रथम २० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी हमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली. राजू उंबरकर यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात विपुल खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीने नटलेला हा मतदार संघ आहे. खनिजावर आधारित अनेक उद्योग या परिसरात आहेत. मात्र तरीही युवकांच्या हाताला कामे मिळत नाही. येथील उद्योगांमध्ये परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. भूमिपुत्रांना डावलले जात आहे. त्यामुळे येथील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी जराही लक्ष दिले नाही. कोळसाखाणींनी वेढलेला हा मतदार संघ आहे. कोळशावर आधारित अनेक उद्योग व कंपन्या याठिकाणी अस्तित्वात आहेत. लाइमस्टोन व डोलोमाइटच्याही खदानी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहेत. यावर आधारितही उद्योग वणी मतदार संघात भरपूर आहेत. गिट्टीच्या खाणी व क्रेशरही या मतदार संघात आहेत. मात्र तरीही बेरोजगारीची समस्या सुटली नाही. सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत आहे. त्यांचं वय वाढत चाललं पण त्यांना स्थायिक रोजगार मिळतांना दिसत नाही. वणी मतदार संघातील बेरोजगारीचा वाढता आलेख बघता राजू उंबरकर यांना बेरोजगारांच्या व्यथा बघवल्या नाहीत. त्यांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्प करून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ६ हजार ७०० बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला होता.
युवकांचा प्रेरणास्रोत असलेला हा नेता आता निवडणूक रिंगणात उताराला आहे. महाराष्ट नवनिर्माण सेनचे रेल्वे इंजिन विकासाच्या रुळावर चालवून वणी मतदार संघातील जनतेचा प्रवास सुखकर करण्याचा संकल्प या नेत्याने केला आहे. मतदारांनी हिरवी झेंडी दाखविल्यास रेल्वे इंजिन विकासाचा प्लॅटफार्म गाठल्याशिवाय राहणार नाही. आमदार झाल्यानंतर २० हजार युवकांच्या हाताला काम देण्याचं पाहिलं उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही राजू उंबरकर यांनी दिली आहे. युवा वर्गाचा खरा कळवळा कुणाला असेल तर ते राजू उंबरकर आहेत. मराठी युवकांवरील अन्याय त्यांनी कधीही सहन केला नाही. मराठी युवकांच्या अस्मितेचं रक्षण त्यांनी केलं आहे. मराठी युवकांच्या अधिकारासाठी वेळप्रसंगी त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतल्या आहेत. मराठी युवकांचा मानसन्मान वाढविण्याचं काम राजू उंबरकर यांनी केलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवावर्ग हा त्यांच्याशी जुळला आहे. युवा मनसेसैनिक त्यांचा जोरदार प्रचारही करीत आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यास सर्वप्रथम वणी विधानसभा क्षेत्रातील २० हजार युकांच्या हाताला काम देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments: