Latest News

Latest News
Loading...

चिखलगाव, गणेशपूर, लालगुडा, वागदरा येथे संजय देरकर यांचा जोरदार प्रचार, शहरातून काढण्यात आली भव्य रॅली


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मतदार संघातील लोकप्रिय नेते संजय देरकर यांना शिवसेनेकडून (उबाठा) उमेदवारी मिळाल्याने मतदार संघात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारालाही जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये तरुणाईसह युवावर्ग व जेष्ठ नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. त्यांच्या प्रचार सभांनाही नागरिकांची एकच गर्दी उसळतांना दिसत आहे. संजय देरकर यांचा आघाडीचा प्रचार सुरु आहे. गावागावात, घरोघरी, दारोदारी जाऊन त्यांचा प्रचार करण्यात येत आहे. संजय देरकर यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. मतदार संघातील नागरिकांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत. त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी एकवटली आहे. 
 
महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. शिवसैनिकांनी तर संजय देरकर यांच्या प्रचारात स्वतःला वाहून घेतले आहे. महिलाही गावागावात घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. मशाल पेटवून वणी मतदार संघात दाटलेला अंधकार दूर करण्याचा संकल्पच महाविकास आघाडीने केल्याचे दिसून येत आहे. काल १४ नोव्हेंबरला चिखलगाव, वागदरा, लालगुडा व गणेशपूर या गावांमध्ये संजय देरकर यांचा झंझावाती प्रचार करण्यात आला. गावांमधून भव्य प्रचार रॅलीही काढण्यात आली. संजय देरकर यांच्या प्रचाराला गाववासीयांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वणी शहरातूनही भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेस, शिवसेना यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री वसंत जिनिंग लॉन येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. 
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या प्रचार सभेला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी शिक्षण अधिकारी उत्तमराव गेडाम, माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या किरण देरकर, संध्या बोबडे, साधना गोहोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. आमदार सुधाकर अडबाले यांनी महायुती सरकारने देशाची व महाराष्ट्राची काय अवस्था केली याची विस्तृत माहिती आपल्या भाषणातून दिली. महायुती सरकारने लोकशाही प्रधान देशात हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार चालविला. एका पक्षाचं सरकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात सत्तेचा वापर केला. महाराष्ट्रात त्यांनी एकाधिकारशाही गाजविली. भारत किंवा महाराष्ट्र सरकार न म्हणता ते भाजप सरकार म्हणतात. या सरकारने शिक्षण क्षेत्राचं पार वाटोळं केलं आहे. शिक्षक भरतीचे सर्व अधिकार मंत्रालयाकडे राखून ठेवले आहेत. सरकारी शाळांचे खाजगीकरण केले जात आहे. शिक्षणाचे बाजारीकरण केले जात आहे. नोकर भरतीवर अंकुश लावण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीने शासकीय पदे भरली जात आहे. सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. युवकांच्या हाताला कामे नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. या सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं आहे. आणि व्यापारी मित्रांना मात्र मालामाल केलं आहे. व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं कर्ज माफ केलं जातं. पण जगाच्या पोशिंद्याचं कर्ज माफ करण्याकरिता यांची जीभ वळत नाही. त्यामुळे आता यांनाच विचारावंसं वाटतं की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. महागाईने जनता होरपळत आहे. आणि हे केवळ जातीचं राजकारण करण्यात गुंग आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयतेचं अवडंबर माजविण्याचं काम या सरकारने केलं आहे. गरिबी व लाचारीत खितपत ठेवण्याकरिता मोफत राशन दिलं जातं. पण स्वाभिमानाने जगता यावं म्हणून युवकांना रोजगार दिले जात नाही. आणि म्हणूनच आता सुज्ञ मतदारांनी विचार करावा की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं. कारण परिस्थिती तुमच्या समोर आहे. आधुनिक महाराष्ट्राची ओळख बदलण्यापूर्वी मतदारांनी सावध व्हावं, असे उद्बोधनात्मक विचार आमदार अडबाले यांनी या जाहीर प्रचार सभेतून व्यक्त केले. 

यावेळी आशिष खुलसंगे यांनी आपल्या भाषणातून विद्यमान आमदारांच्या विकासकामांचा खरपुच समाचार घेतला. मतदार संघाचा विकास किती केला व स्वतःचा विकास कसा साधला यावर त्यांनी सडेतोड प्रश्न उपस्थित केले. ग्रामीण भागाची दशा आजही तशीच आहे. ग्रामीण भागात आजही रस्ते नाहीत. गावात पिण्याच्या पाण्याचे ऑरो लावले, पण काही गावातील ऑरोत अजूनही पाणी आले नाही. प्रथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अतिशय दयनीय आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळतांना दिसत नाही. वणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा विषय अजूनही खितपत पडला आहे. जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. काही जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळा तर बंद पडल्या आहेत. शिक्षण व आरोग्याच्या सुविधा तोडक्या आहेत. मग काय मलाई लाटण्याच्या कामांनाच विकास म्हणायचं, असे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले. किरण देरकर यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. 

वामनराव कासावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, हे सरकार पैसा व संपत्तीच्या बळावर महाराष्ट्रात आले. या सरकारचे धेय्य धोरण व दृष्टिकोन पूर्णतः विसंगत आहे. जनसामान्यांचा विचार करणारं हे सरकार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार नाही. युवकांना रोजगार देणारं हे सरकार नाही. केवळ जातीजातींमध्ये वाद निर्माण करणारं हे सरकार आहे. एका सुधीरने नाते संबंधाविषयी अपशब्द वापरले होते. तर दुसऱ्या सुधीरने एका जाती विषयी गरड ओकली आहे. देशातील व महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचं काम या पक्षातील नेते व प्रवक्ते करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून हे सरकार हद्दपार करणं गरजेचं झालं आहे. त्याकरिता वणी मतदार संघातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजय देरकर यांना बहुमतांनी विजयी करणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांचा विजय साकार करण्याचे आवाहन वामनराव कासावार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Powered by Blogger.