Latest News

Latest News
Loading...

वणी मतदार संघात चौरंगी लढत, तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना एका बंडखोराचे कडवे आव्हान

 
 
प्रशांत चंदनखेडे वणी 

विधानसभा निवडणूक अगदीच जवळ आल्याने उमेदवारांच्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. प्रचारात आघाडी घेण्याची उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत प्रचार तोफा डागल्या जात आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला जात आहे. उमेदवार मतदार संघ पिंजून काढत आहेत. प्रचाराला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची प्रचाराची लगबग पाहायला मिळत आहे. २० नोव्हेंबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे. वणी मतदार संघातील २ लाख ८४ हजार मतदार १२ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवाराला मतदारांचा कौल मिळतो व कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते, हे २३ नोव्हेंबरला मत मोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. 

वणी मतदार संघातून एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात महायुतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार, महाविकास आघाडीचे संजय देरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चौरंगी लढतीत कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडी कडून उभे असलेले राजेंद्र निमसटकर व वंचित मधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवीत असलेले हरीश पाते हे कोणत्या उमेदवाराचे गणित बिघडवतील हे ही पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. त्यातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट व बहुजन समाज पार्टीचे बाळासाहेब खैरे यांच्या पारड्यात किती मतदान पडेल, यावरही विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. हे चारही उमेदवार त्या त्या विचारसरणीच्या मतदारांना आकर्षित करण्यात कितपत यशस्वी ठरतील व किती मतांची गोळा बेरीज जुळवतील याचाही प्रमुख उमेदवारांच्या विजयावर परिणाम होणार आहे. तसेच अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावरे केतन पारखी, नारायण गोडे, निखिल ढूरके, नारायण आत्राम यांना मिळणारी मतेही कुणाच्या पथ्यावर पडतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव २० नोव्हेंबरला रंगणार आहे. नागरिक हा उत्सव साजरा करण्याकरिता सज्ज झाले आहेत. उमेदवारांचा या उत्सवात प्रमुख सहभाग असणार आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे मतदार संघात राजकीय प्राबल्य दाखविण्याचं लोकशाहीचं एक व्यासपीठ आहे. यात राजकीय डावपेच आखणारा व मतदारांना प्रभावित करणारा उमेदवार लोकप्रतिनिधी बनतो. तिसऱ्यांदा भाजप कडून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा सामना यावेळी महाविकास आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या संजय देरकर, मनसेचे राजू उंबरकर व बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्याशी होणार आहे. संजय देरकर व राजू उंबरकर यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा १५ ते २० वर्षांचा अनुभव आहे. तसेच राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले संजय खाडे यांनी देखील या निवडणुकीत तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी वणी मतदार संघात घडल्या आहेत. एका पदाधिकाऱ्याच्या वाचाळ वक्तव्याने आमदार बोदकुरवार यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. तर बंडखोरी करणाऱ्या संजय खाडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका जाती बद्दल चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले. या पदाधिकाऱ्याच्या या बेलगाम वक्तव्यामुळे वणी मतदार संघात आमदार बोदकुरवार यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वणी मतदार संघातील चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसून येत आहे. 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वणी मतदार संघ २०१४  पासून भाजपच्या ताब्यात गेला. भाजपने काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावून विधानसभेच्या सतत दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय संपादन केला. परंतु आता महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे. संजय देरकर यांच्या रूपाने अनुभवी उमेदवार महाविकास आघाडीने निवडणूक रिंगणात उतरविला आहे. त्यांच्या प्रचारार्थ स्वतः उद्धव ठाकरे हे वणीला आले होते. त्यांच्या प्रचार सभेने या मतदार संघातील उमेदवारांचे डावपेच पालथे घातल्याचे बोलल्या जात आहे. मात्र राजू उंबरकर हे विजयासाठी पूर्ण ताकद लावून आहेत. त्यांनी मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडविला आहे. संजय खाडे हे देखील पायाला भिंगरी लागल्यागत वणी मतदार संघ पिंजून काढत आहेत. प्रमुख राजकीय पक्षांच्या तीन बलाढ्य उमेदवारांनी आपापली रणनीती आखली आहे. तर बंडखोर उमेदवार संजय खाडे यांनी देखील व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे या चौरंगी लढतीत कुणाच्या शिरावर विजयाचा मुकुट चढेल हे मत मोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.