अपक्ष उमेदवार केतन पारखी हा उच्च शिक्षित तरुण उतरला राजकीय मात्तबरांच्या स्पर्धेत, आजच्या राजकीय परिस्थिती विषयी व्यक्त केली खंत
प्रशांत चंदनखेडे वणी
आजचं युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल युगात वावरत असतांना अनेकांना अजूनही ते अवगत झालेलं नाही. शासनाकडूनही योग्य मार्गदर्शन होतांना दिसत नाही. देशात रूढ झालेली ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बऱ्याच लोकांच्या डोक्यात बसली नाही. शासनाची ऑनलाईन प्रणाली बऱ्याच लोकांना न कळल्याने बरेच नागरिक व विद्यार्थी शासनाच्या योजना तसेच सोइ सुविधांपासून वंचित राहत आहेत. सर्वच शैक्षणिक कामे ऑनलाईन झाली आहेत. महत्वाची कागदपत्रेही मिळविण्याकरिता ऑनलाइनच प्रक्रिया करावी लागते. परंतु नागरिक अजूनही ऑनलाईन कामे करण्यात तरबेज झाले नाहीत. शासनाकडून नागरिकांची ऑनलाईन कामे करून देण्याकरिता कुठेही शासकीय जनहित केंद्र उभारण्यात आले नाही. त्यामुळे मागास भागांमधील विद्यार्थी व नागरिक शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेवटच्या घटकालाही ऑनलाईन सुविधा घेता यावी, हा आपण प्रयत्न करणार असल्याचे केतन पारखी यांनी लोकसंदेशी बोलतांना सांगितले.
त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी अतिशय कमी असून सुशिक्षित बेरोजगारी वाढू लागली आहे. उच्च शिक्षण घेतलेले तरुण रोजगाराच्या शोधात भटकतांना दिसतात. आधी शिक्षण घेण्यासाठीचा संघर्ष, नंतर रोजगारासाठीची वणवण हे चित्र आज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही निर्माण झालं आहे. शिक्षण प्रचंड महागडं करण्यात आलं आहे. शैक्षणिक शुल्कात अवाढव्य वाढ करण्यात आली आहे. पोटाला चिमटे घेऊन पालकांनी मुलांना शिकवलंही तरी त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नुसार रोजगार मिळतांना दिसत नाही. रोजगारासाठी त्यांचा संघर्ष सुरु असतो. उच्च शिक्षण घेतलेले तरुण तुंटपुज्या मिळकतीवर काम करीत आहेत. त्यात त्यांच्या बेसिक गरजाही पूर्ण होतांना दिसत नाही. अत्यल्प मिळकतीत ऐच्छिक जीवन जगता येत नसल्याने ते नेहमीच नैराश्येत दिसतात. एकीकडे महागाईचा भडका उडाला असतांना दुसरीकडे अतिशय कमी मिळकतीत राबवून घेतले जात असल्याने युवकांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला आहे. उदर्निवाह, शिक्षण, उपचार व दैनंदिन खर्च या अत्यल्प मिळकतीत भागवणं कठीण झालं आहे. जनतेला समाधानकारक जीवन जगता यावं, याकरिता कोणतेच प्रयत्न होतांना दिसत नाही. जनतेचे प्रश्न कुणीही उचलून धरायला तयार नाही. लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी राजकारण करू लागल्याने जनतेवर दारिद्रयात जीवन जगण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलावी म्हणून आपण राजकारणात उतरलो असल्याचे अपक्ष उमेदवार व सॉफ्टवेअर इंजिनिअर केतन पारखी याने लोकसंदेश न्यूजशी बोलतांना सांगितले.
Comments
Post a Comment